CM Eknath Shinde News: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सर्वच पक्षांनी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, असे जाहीर केले होते. यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.
श्रीकांत शिंदे यांच्या कामाचा एक कार्यअहवाल प्रसिद्ध करण्यात आला. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीकांत शिंदे पुन्हा खासदार होतील, असे म्हटले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवाल प्रकाशित झाला. गेल्या १० वर्षांत जी प्रगती झाली, कल्याण लोकसभा मतदारसंघाचा जो सर्वांगीण विकास झाला, त्याची माहिती या अहवालात देण्यात आलेली आहे. भविष्यात या लोकसभा मतदारसंघाची गरज लक्षात घेऊन त्याचाही विचार या ठिकाणी होईल. अनेक वर्षात कल्याण लोकसभा मतदारसंघात जी कामे झाली नाही, ती गेल्या १० वर्षांत करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षांत देशाचा विकास केला, त्याप्रमाणे कल्याणमध्येही वेगाने विकास झाला, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
पुन्हा श्रीकांत शिंदे खासदार होणार, कल्याणच्या मतदारांचा निर्धार
कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे यांना निवडून देण्याचा निर्णय, निश्चय आणि संकल्प केलेला आहे. फिर एक बार, श्रीकांत शिंदे खासदार, असा निर्धार मतदारांनी केला आहे. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. मतदारांनाही शुभेच्छा देतो, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला.