Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. यातच जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी औरंगजेबावर केलेल्या विधानावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाडांवर टीका केली आहे.
भाजप नेत्यांसह शिंदे गटातील नेतेही जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानावरून आक्रमक झाले आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा साधला आहे. इतिहास पुसण्याचा, बदलण्याचा जो काही प्रयत्न सुरु आहे त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. औरंगजेबाच्या बाबतीत कोणाचे प्रेम ऊतू जात आहे. ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला, महाराष्ट्रातील अनेक मंदिरे तोडून टाकली, उद्ध्वस्त केली, माय-भगिनींवर अत्याचार केले त्याचा पुळका कोणाला येतो यावरुन त्यांची वृत्ती कळून येते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवरील त्यांचे प्रेम वृत्तीतून दिसून येतं. याचा निषेध करावा तितका कमी आहे, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला.
नेमके काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?
छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचे मंदिरही फोडले असते. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आले. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते.
दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीकास्त्र सोडले. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या सोयीने इतिहास मांडतात, असा आरोप करत, जितेंद्र आव्हाड यांनी आता औरंगजेबाचे मंदिर उभारावे आणि उद्घाटनाला अजित पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बोलवावे, असा खोचक टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"