Eknath Shinde on Amit Thackeray Sada Sarvankar, Mahim Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. त्यातही दादर माहिम मतदारसंघाबाबत विशेष चर्चा सुरु आहे. कारण या मतदारसंघातून पहिल्यांदाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे आपले नशीब आजमावणार आहेत. या मतदारसंघातून अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. याच मतदारसंघात ठाकरे गटाचे महेश सावंत तर शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी अर्ज भरला आहे. सदा सरवणकर हे तेथील सध्याचे आमदार असून त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. महायुती आणि मनसे यांच्यात सामंजस्य होऊन सदा सरवणकर माघार घेतील अशी चर्चा सुरु आहे. पण ते निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे त्यांनीच गेल्या ४-५ दिवसात अनेकदा सांगितले आहे. याशिवाय आता याच मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भूमिका मांडली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
"लोकसभा निवडणुकीच्या वेळा आम्ही एकत्र होतो. माझी राज ठाकरेंशी चर्चादेखील झाली होती. मी त्यांना तेव्हाच विचारलं होतं की विधानसभेसाठी तुमची रणनीती काय असेल? त्यावेळी ते मला म्हणाले होते की, शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी महायुतीची चर्चा होऊ दे. त्यानंतर आपण बोलूया, पण त्यांनी थेट उमेदवार देण्यास सुरुवात केली. (माहिममध्ये जेथून अमित ठाकरे लढणार आहेत,) तेथून आमचाही आमदार दोन-तीन टर्मपासून जिंकत आला आहे. सदा सरवणकर हे आमचे जुने सहकारी आणि कार्यकर्ता आहेत. ते आमचे आमदार आहेत. मी त्यांच्याशीही चर्चा केली. त्यांचे कार्यकर्ते निवडणूक लढवण्याबाबत खूपच आक्रमक आहेत. आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांचीही काळजी घ्यावी लागते. कार्यकर्त्यांचे मनोबल खचू नये हे देखील नेत्यांचे काम असते," मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
"निश्चितपणे सांगतो सध्या भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी अजितदादा अशी आमची महायुती आहे. या महायुती अंतर्गत आम्ही निवडणूक लढवत आहोत. आमच्यासोबत आठवलेंची रिपाईं, जनसुराज असे विविध मित्रपक्ष आहेत. आम्ही निवडणूक लढू, बहुमत मिळवू आणि नक्की जिंकू" असेही पुढे मुख्यमंत्री म्हणाले.