Eknath Shinde vs Ajit Pawar, Winter Session: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे नागपूरमधील पहिलेच अधिवेशन वादळी होणार असे बोलले जात होते. त्यानुसार सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना तर, सभागृहाचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते. असे असताना हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवसही चांगलाच गाजला. विरोधकांनी सरकारवर हल्लोबोल केलाच, पण त्याला प्रत्युत्तर देताना सरकारकडूनही विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाल्याचे दिसले. पण त्यांच्या धरणातील पाण्यासंदर्भातील एका वादग्रस्त विधानाची आठवण करून देत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात अजित पवारांवर खोचक शब्दांत टीका केली. अजित पवारांनी काही वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना धरणातील पाण्याच्या मुद्द्यावरून वादग्रस्त विधान केलं होतं. एका जाहीर सभेत शेतकऱ्यांनी पाण्याच्या तुटवड्याचा मुद्दा मांडल्यावर, "धरणात पाणी नाही तर तिथे मी स्वत: तिथे...?” असे विधान त्यांनी केले होते. या विधानानंतर अजित पवारांनी आत्मक्लेश आंदोलन केले होते. पण या विधानावरून बराच वाद झाला. याचाच दाखला देत आज एकनाथ शिंदे यांनी त्यांना उत्तर दिले.
नक्की काय घडले?
"अजितदादा, तुम्ही काल बोललाच की मी आता चुकत नाही. मी आता काळजी घेतो. पण जेव्हा शेतकऱ्यांनी पाणी मागितलं होतं तेव्हा तुमच्या तोंडून काहीतरी निघून गेलं. तेव्हा मग तुम्हाला आत्मक्लेश करायला जावं लागलं," असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. त्यावर अजित पवार बाकावर बसूनच म्हणाले- "मी आत्मक्लेश केला होता. तुम्ही १८५७ चा विषय पुन्हा काढू नका." यावर पुन्हा शिंदे म्हणाले, “मी चुकीचं सांगत नाही. तुम्ही आत्मक्लेश केलात. मी १८५७ चा विषय काढत नाहीये. पण तुम्ही ५० वर्षांपूर्वीचे काढायला लागले आहात. आम्ही ते काढत नाही. मी कधीही तुम्हाला वाईट बोलणार नाही. आत्मक्लेश करणं याचा अर्थ वाईट नाही. माणूस जेव्हा चुकतो, तेव्हा जो चूक सुधारतो. तो त्या माणसाच्या मनाचा मोठेपणा असतो. पण एक माणूस चुकतो. दोन-पाच माणसं चुकू शकतात. पण ५० माणसं चुकीचे आणि मी एकटा बरोबर असं कसं होऊ शकतं?", असा कोंडीत पकडणारा सवाल त्यांनी अजित पवार यांनाच केला. "मी फक्त तुमच्याबद्दल बोलत नाही. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही आता बोलताना काळजी घेता ही चांगलीच बाब आहे, पण इतरांनीही ते समजून घ्यायला हवं", असे एकनाथ शिंदे नाव न ठाकरे गटावर निशाणा साधत म्हणाले.