मुंबई - राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांचीही ताकद वाढताना दिसत आहे. दुसरीकडे पडलेल्या भगदाडातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे प्रचंड सक्रीय झाले आहेत. यानंतर आता राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदेंनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख करत ट्वीट केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला. त्यानंतर आता राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे गट असा उल्लेख करत ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. "राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना - भाजपा युती सरकारला जनतेचा कौल... शिवसेना - भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना - भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार..." असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये एक पोस्टरही शेअर केलं आहे. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो आहेत. तसेच जनतेचा कौल म्हणत राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निकालाची आकडेवारी देण्यात आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंनी ‘उद्धव ठाकरे गट’ असा उल्लेख केला आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना - भाजपा युती सरकारला जनतेचा कौल असं म्हणत या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला ८२, शिवसेना ४०, उद्धव ठाकरे गट २७, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस २२ आणि इतरांना ४७ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचं म्हटलं आहे.
"मला निवडून यायला कोणत्याही निशाणीची गरज नाही कारण..."; एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
मुख्यमंत्री शिंदे यांनी एक मोठं विधान केलं आहे. "निवडून येण्यासाठी मला चिन्हाची गरज नाही" असं म्हटलं आहे. "माझ्यावर काही लोकं आरोप लावतात... एकनाथ शिंदेने हे पाप केलं, पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की, मला निवडून यायला कोणत्याही निशाणीची गरज लागत नाही, एवढं काम मी माझ्या मतदार संघात करून ठेवलं आहे" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.