मुंबई - राज्याच्या विधानसभेत बहुमत चाचणीत शिंदे सरकारनं यश प्राप्त केलं. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सर्व पक्षीय नेत्यांची भाषणं झाली. विविध नेत्यांकडून जोरदार भाषणं झाली. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी देखील रोखठोक भाषण केलं आहे. "शिवसेना वाचवण्यासाठी मी शहीद झालो, तरी चालेल पण मागे हटणार नाही" असं म्हटलं आहे. तसेच अन्यायाविरुद्ध बंड करणं ही बाळासाहेबांचीच शिकवण असल्याचंही ते म्हणाले. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीएकनाथ शिंदेंवर टीका केली.
"काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता'' असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदेंना लगावला होता. याला आता मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला" असं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "रिक्षाच्या स्पीडपुढे मर्सिडीजचा स्पीड फिका पडला.. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार!!" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच MaharashtraFirst हा हॅशटॅग देखील वापरला आहे.
शिवसेना महिला संघटक आणि संपर्कप्रमुख, संघटक यांची शिवसेनाभवनात बैठक संपन्न झाली. अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. त्यानंतर, उद्धव ठाकरेंनीही महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी, एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली. ''काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता'', असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. तसेच, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील माहिती नाही, असा खोचक टोमणाही त्यांनी मारला.