मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील वॉर रूमच्या माध्यमातून आत्तापर्यंत करण्यात येत असलेली देखरेख बाजूला सारून नवीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट’च्या माध्यमातून गुरुवारी एक बैठक घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
अजित पवार यांच्या या नव्या खेळीमुळे प्रशासनावर कोण लक्ष ठेवणार व राज्यातील प्रकल्पांवर नक्की कोणाचे नियंत्रण राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांची आक्रमक काम करण्याची पद्धत आहे. ते उपमुख्यमंत्री झाल्याने मुख्यमंत्री यांना सेट बॅक मिळाले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून मुख्यमंत्री, त्यांचे आमदार, भाजपा आमदार अस्वस्थ आहेत, ते बोलून दाखवत नाहीत. मात्र, ते अस्वस्थ आहेत, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना न्यायालयाने जामीन दिल्याने सर्वांना आनंद आहे. त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले होते. राजकारणाच्या माध्यमातून आरोप करण्यात आले होते, सर्वांना हे प्रकरण खोटे आहे, हे माहीत आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितले. राजकीय विरोधकांना त्रास देण्याचे काम सुरू आहे, असा आरोपही अनिल देशमुख यांनी केला आहे.