मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी मोठं सत्तानाट्य पाहायला मिळालं. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंसह काही आमदार रातोरात सूरतला गेले. त्यानंतर शिंदे यांनी बंडाचा पवित्रा घेतल्याचं समोर आले. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदारांनी साथ दिली. एक एक करत ठाकरेंकडील आमदार सूरतला गेले. त्यानंतर एकनाथ शिंदेंसह या सर्व आमदारांचा मुक्काम गुवाहाटीला झाला.
राज्यातील राजकीय घडामोडीत गुवाहाटीचं महत्त्वं अधिक वाढलं. त्यातच एकीकडे मध्यावधीच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह गुवाहाटीला जाणार असल्याचं समोर आले आहे. येत्या २१ नोव्हेंबरला शिंदे समर्थक आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. सत्तानाट्यात महाराष्ट्रात परत येताना एकनाथ शिंदेसह सगळे आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा दौरा होणार असल्याची चर्चा होती आता त्याची तारीख ठरली आहे.
गुवाहाटीच्या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून एका विशेष पूजेचं आयोजन करण्यात आले आहे. सत्तांतराच्या काळात जी पूजा झाली त्याच पद्धतीची ही पूजा असणार आहे. महाराष्ट्रात सरकार बनवल्यानंतर पुन्हा एकदा तुझ्या दर्शनाला येईन असं साकडं एकनाथ शिंदे यांनी घातलं होते. म्हणूनच आता शिंदे आणि आमदार गुवाहाटीला जात आहे. या दौऱ्याची पूर्वतयारी सुरू असून जाण्या येण्याचं नियोजन आखलं जात आहे.
नवस पूर्ण करायला गुवाहाटीला निघालोमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदारांसह २१ नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला जाणार आहे यावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. सर्व आमदार जात आहे मी पण जाणार आहे. आम्ही सगळ्यांनी कामाख्या देवीला नवस केला होता म्हणून सरकार आलं असं मोठं विधान बच्चू कडू यांनी अमरावतीत केलं. आता कामाख्या देवीला दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे. शेतकऱ्यांचे भलं झालं पाहिजे. सरकार पडलं तरी बेहत्तर पण शेतकरी अडचणीत नाही आला पाहिजे असं साकडं घालणार असल्याचं सांगितले.