विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांना तंबी; अजित पवारांनी घेतली फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 06:06 PM2022-08-23T18:06:35+5:302022-08-23T18:07:23+5:30
मी कमी बोलतो, ऐकून घेतो. मी आणि उपमुख्यमंत्री दोघेही फिल्डवर काम केलेले आहे असं मुख्यमंत्री शिंदेंनी सभागृहात म्हटलं.
मुंबई - तुम्ही जे काही बोलताय त्यापेक्षा डबल, तिबल, चौबल बोलू शकतो. मी तुमच्यासोबत काम केलंय. मी जे ऐकतोय, पाहतोय. एखाद्याची मर्यादा असतो. जर मर्यादेच्या पलीकडे गेले तर कुणीही कुणाचा मुलाहिजा ठेऊ शकत नाही. माझ्याकडे सगळ्यांचा चिठ्ठा आहे. मला राजकारण करायचं नाही. परंतु आम्हाला कामातून उत्तर द्यायचं आहे. मी जे राजकारण पाहतोय मला हे बोलणं आवश्यक वाटतं असं सांगत विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना तंबी दिली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विरोधी पक्षाचं काम सरकारवर टीका करणं असते. सरकार काय चुकत असेल तर विरोधी पक्षांनी बोट दाखवण्याचं काम जरूर केले पाहिजे. वारंवार महाराष्ट्रावर नैसर्गिक संकटं येतात. या संकटात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. टीका करावी पण त्यात राजकारण असू नये. पूरग्रस्त भागात कोण आधी गेले हे महत्त्वाचं नाही. सत्ताधारी आणि विरोधक लोकशाहीच्या रथाची दोन चाके आहेत. त्रुटी असतील तर विरोधी पक्षाने निदर्शनास आणाव्यात. टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा विरोधी पक्षांनी सूचना करण्यावर भर दिला पाहिजे असं त्यांनी म्हटलं.
तसेच मी कमी बोलतो, ऐकून घेतो. मी आणि उपमुख्यमंत्री दोघेही फिल्डवर काम केलेले आहे. मी पूर्वी तुमच्यासोबत होतो. तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो. जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा मी संबंधित पूरग्रस्त भागात जाऊन मदत केली आहे. केरळात पूर आला तिथेही मदतीला गेलो. गुवाहाटीत असताना तिथेही पूर आला होता. काहीजणांनी आमच्यावर टीका केली. परंतु तेथील पूरग्रस्तांना मदत करण्याचं काम आम्ही केले. प्रत्येक गोष्टीत राजकारण राजकारण करता. सहन करण्याची मर्यादा असते. प्रत्येक माणूस काम करताना काही ना काही राहून गेलेले असते. त्यामुळे ते शोधण्याचं काम मला कुणी करायला लावू नये. मला इशारा द्यायचा नाही. मी मुख्यमंत्री नसून कार्यकर्ता आहे. रात्री ३-४ पर्यंत आम्ही काम करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या जितक्या कमी करता येईल तितकं करायचं आहे. आत्महत्या कमी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करू शकलो तर त्याचे समाधान मिळाले. सरकारची ही जबाबदारी आहे. आपण सगळ्यांनी मिळून आत्महत्या कमी होतील त्यासाठी काम करूया असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना केले.
अजित पवारांनी घेतली फिरकी
राजकारणात काम करताना श्रद्धा सबुरी हा महत्त्वाचा गुण असतो. विरोधी पक्षाचे आरोप सहन करण्यापलीकडचे आहेत. सहन करण्याला मर्यादा असतात. विरोधकांच्या चिठ्ठ्या आहेत असं सांगत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात इशारा देण्याचं काम केलंय का असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.