मुंबई - २०१९ ची निवडणूक महायुती म्हणून आम्ही लढवली. बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनरवर फोटो होतो. जनतेनेही या युतीला कौल दिला. त्यानंतर दुर्दैवाने भाजपाला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. तेव्हा खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना दु:ख झाले असेल. ज्यांना बाळासाहेबांनी आयुष्यभर जवळ केले नाही त्यांच्यासोबत शिवसेना गेली असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही जी भूमिका घेतली ती बाळासाहेबांना आवडणारी आणि त्यांच्या विचारांची भूमिका घेतली. युतीचं सरकार यापूर्वी गठीत झाले होते त्याचे शिल्पकार बाळासाहेब होते. महायुती म्हणून निवडणूक लढवली आणि जनमताने कौल दिल्यानंतर २०१९ मध्ये दुर्दैवाने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. ज्या बाळासाहेबांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले नाही. मात्र महाविकास आघाडी जेव्हा बनवली तेव्हाच बाळासाहेबांना दु:खं झाले असेल. आमदारांचे खच्चीकरण होत होते, शिवसैनिकांवर अन्याय होत होता म्हणून शिवसैनिकांवर अन्याय दूर करण्यासाठी आम्ही हा लढा उभा केला. बाळासाहेबांना खरा आनंद वाटत असेल शिवसेना वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि आमदारांनी पुढाकार घेतला असं त्यांनी सांगितले.
तसेच निवडणूक आयोगाकडे दोन्ही गट त्यांची भूमिका मांडेल. विधानसभेत दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे आहे. शिवसेना आम्हीच आहोत. लोकसभेतही दोन तृतीयांश खासदार आमच्यासोबत आहेत. शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता आहे. ही शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. विधिमंडळात आम्हाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासमोर आम्ही आमची भूमिका मांडू असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मंत्रिमंडळ विस्तार लवकरचजी कामे मागच्या मंत्रिमंडळाने घाईगडबडीने निर्णय घेतले, जीआर काढले त्याला स्थगिती दिली आहे. विकासकामांना स्थगिती देणार नाही. ज्याप्रकारे निर्णय घेतले त्याला स्थगिती दिली आहे. काल आम्ही दिल्लीला गेलो होतो, पंतप्रधानांनी ठेवलेल्या स्नेह भोजनला आम्ही उपस्थित होतो. सर्वच वरिष्ठ नेत्यांची भेट झाली. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल असं शिंदेंनी सांगितले.
मला सुरक्षा देण्याची शिफारस गृहमंत्रालयाची होती मी गडचिरोलीत पालकमंत्री म्हणून काम करत होतो, पोलिसांनी नक्षलांविरोधात मोहिम आखली होती. अनेक विकासकामे उभी केली. त्याला नक्षलांनी विरोध केला. परंतु पोलिसांनी त्यांना न जुमानता नक्षलविरोधी मोहिम तीव्र केली. त्यात २७ नक्षलींचा खात्मा केला. तेव्हा मला मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. गृहविभागाने झेड प्लस सुरक्षा देण्याची शिफारस केली होती. त्याबाबत शंभुराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.