मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अलीकडच्या काळात दोन हेलिकॉप्टर अपघातांतून थोडक्यात सुखरूप बचावले. यातील अलिबाग अपघाताची तर फारशी माहिती समोर आली नाही. बुधवारी, प्रथमच स्वत: मुख्यमंत्र्यांनी या अपघाताचा स्वानुभव कथन केला. मुख्यमंत्र्यांच्या तोंडून या अपघाताचा थरार ऐकताना विधान परिषदेत विलक्षण शांतता पसरली होती. मुख्यमंत्री म्हणाले, हेलिकॉप्टर पूर्ण बंद झाल्यावर त्यातून उतरण्याची सूचना को-पायलट देत असतो; परंतु अलिबाग येथील हेलिपॅडवर उतरलो, तेंव्हा हेलिकॉप्टर बंद होण्यापूर्वीच आम्हाला खाली उतरण्याची सूचना देण्यात आली. कार्यक्रमाच्या गडबडीत किंवा सजग नसल्यामुळे तेंव्हा आमच्या लक्षात आले नाही. परतीच्या वेळीही तसेच घडले. एरवी हेलिकॉप्टरमध्ये बसल्यानंतर इंजिन सुरू केले जाते. परंतु, मी आणि विनोद तावडे तिथे पोहोचण्याआधीच हेलिकॉप्टर सुरू करण्यात आले होते. त्यातही समोरून लोक येत असल्याचे पाहून पायलटने हेलिकॉप्टर वर नेण्याचा प्रयत्न केला; परंतु ते सरळ खाली आले! सुदैवाने दरवाजा बंद असल्याने आम्ही आत जाऊ शकलो नाही. हा सारा प्रकार अनाकलनीय होता. या प्रवासासाठी विमान प्राधिकरणाने मान्यता दिलेलेच हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यात आले होते. एका अनुभवी पायलटच्या हातून हे घडावे, हे अकल्पित होते. प्रसंगावधान नसते राखले तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. राज्यभरातील हेलिपॅडचे आॅडिटलातूर जिल्ह्यात निलंगा तसेच रायगड जिल्ह्यात अलिबाग येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेची एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्व्हेस्टीगेशन बोर्डर् (एएआयबी) चौकशी करत आहे. त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाई. शिवाय, हेलिकॉप्टर दुर्घटना टाळण्यासाठी राज्य सरकारने हेलिपॅड लोकेशन पॉलिसी तयार केली असून, यापुढे या धोरणानुसारच हेलिकॉप्टर उतरविण्याची परवानगी देण्यात येईल. तसेच राज्यभरातील सर्व जुन्या हेलिपॅडचे आॅडिट करण्यात येणार आहे. शिवाय अतिविशिष्ट व महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसंदर्भात सुनिश्चित कार्यप्रणाली तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. काँग्रेस सदस्य शरद रणपिसे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्न विचारला होता.
...अन् आम्ही सुखरूप बचावलो!, मुख्यमंत्र्यांनी कथन केला हेलिकॉप्टर दुर्घटनेचा वृत्तान्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 2:49 AM