निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आणि गेल्या दोन-अडीज महिन्यांत या लाडक्या बहिणींच्या खात्यात साडे सात हजार रुपये आले आहेत. तर येत्या काही दिवसांत म्हणजेच दिवाळीपूर्वी ऑक्टोबर महिन्याचे दीड हजार व दिवाळी बोनस म्हणून तीन हजार असे साडे पाच हजार रुपये येण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे लाडकी बहीण खूश होणार आहेच पण दुकानदारही सुखावणार आहेत. कारण हा पैसा मॉलमधील शॉपिंग, छोट्या छोट्या बाजारपेठांपासून ते मोठ्या मोठ्या बाजारपेठांतील कपडे, दागदागिन्यांच्या दुकानांपर्यंत पोहचणार आहे.
निवडणूक आली की पैसा बाहेर पडतो म्हटले जाते. झेंडे, फलक, कार्यकर्ते जमविण्याचा खर्च असुदे की त्यांच्या चाय-नाष्ता, रात्रीच्या पार्ट्या यातून हा पैसा प्रवाहात येत असतो. या काळात पैसा बाहेर पडण्याचे अन्य मार्गही असतील. यातच दिवाळी येत असल्याने कर्मचाऱ्यांचा बोनस, पगार आदी देखील घरातील सदस्यांना कपडालत्ता, मिठाई, फराळ आदी विविध वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च होत असतो. अशातच या लाडक्या बहिणींना मिळणारा पैसा देखील याच काळात बाहेर येणार आहे.
अनेक महिला या गृहीणी म्हणून राबत असतात. काही घ्यायचे झाले की भाऊ, वडील, पती यांच्याकडे पैसे मागावे लागतात. काहीवेळा हे पैसे मिळतात तर अनेकदा यासाठी नकारही मिळतो. परंतू, आता लाडक्या बहीण योजनेमुळे महिन्याला दीड हजार का होईना महिलांच्या हाती पैसा खुळखुळू लागला आहे. काही जणी हा पैसा जपून वापरतीलही, परंतू काही जणी हा पैसा त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरण्याची शक्यता आहे. तसा मानसही काही महिलांनी व्यक्त केला असून याबाबतचे प्लॅनिंगही त्यांनी सुरु केले आहे.
डेकोरेशन, मुलांसाठी कपडे, खेळणी...लाडक्या बहिणीने पैसा हातात नसल्याने अनेकदा आपले मन मारले होते. एखादी साडी आवडली, एखादा कुर्ती आवडली तर ती तिला घेता येत नव्हती. महागाई त्यात घरच्यांचे तोकडे उत्पन्न यात तिला संसाराचा विचार करावा लागत होता. आज योजनेचे पैसे आले तरीही हा विचार असेलच, परंतू तिच्या हातात तिच्या मालकीचे काही पैसे नक्कीच असतील. याचा वापर ती स्वत:साठीही करेल आणि मुलांसाठी कपडालत्ता, खाऊ, घरातील दिवाळीचे साहित्य, डेकोरेशन, पणत्या, कंदील आदी गोष्टी घेण्यासाठीही करणार आहेत.
महिला या काटकसरी असतात. एखादी वस्तू घ्यायची झाली तरी त्या १०० वेळा विचार करतात. यामुळे हातचे राखूनही अनेकजणी पैसे खर्च करणार आहेत. स्वत:च्या इच्छा पूर्ण करण्यासोबतच मुलांच्या इच्छा, माहेरच्यांसाठी देखील काहीतरी घेण्याचा प्लॅनिंग त्यांनी केलेला असणार आहे. हा हजारो कोटींचा पैसा निवडणुकीपूर्वीच बाजारात येणार आहे.