मुंबईः उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर विकासकामांचा धडाका लावला आहे. तसेच आरे कारशेड रद्द करण्यासारखे काही कठोर निर्णयही त्यांनी घेतले आहेत. आता सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन श्वेतपत्रिका काढणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. प्रकल्पांची आवश्यकता, त्यांना लागणारा खर्च, निधीच्या उपलब्धतेसाठी कामांचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आज भाजपाच्या काळातील समृद्धी महामार्ग, मेट्रो प्रकल्पांच्या स्थितीचा आम्ही आढावा घेतला आहे. हे प्रकल्प पुढे कसे जातील, मेट्रोला फायदा कसा होईल आणि हे प्रकल्प अधिक वेगानं कसे पूर्ण होतील, यासाठी प्रकल्पांना पाठिंबा देण्याचं धोरण स्वीकारतो आहे. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये आर्थिक बोजा आहे, तो बोजा परतफेडीसाठी सरकारही भूमिका बजावणार आहे. प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावेत ही आमची भूमिका आहे. याच्यावर मुख्यमंत्री महोदय भाष्य करतील, असे जयंत पाटील म्हणाले आहेत. विशेष म्हणजे या बैठकीला मेट्रोच्या अश्विनी भिडे, समृद्धी महामार्गाचे राधेश्याम मोपलवार उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज झालेल्या या बैठकीमध्ये सध्या राज्यात कोणकोणते प्रकल्प सुरू आहेत, त्यांची वस्तुस्थिती काय आहे, तसेच या प्रकल्पांसाठी आतापर्यंत किती खर्च झालेला आहे, याचा आढावा घेण्यात आला आहे. या मुद्द्यांवर बैठकांमध्ये आढावा घेण्यात येणार असून, स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली होती. बैठकीला सर्व मंत्री आणि संबंधित अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकांमध्ये मेट्रो, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनसह इतर सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे.
सीएमनी घेतला मेट्रो, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनचा आढावा, अश्विनी भिडे, राधेश्याम मोपलवार उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 8:25 PM