'जागावाटप राहू द्या, पुण्याकडे लक्ष द्या'; विरोधकांची सरकारवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 02:36 AM2019-09-27T02:36:42+5:302019-09-27T06:46:25+5:30
'मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडले'
मुंबई : बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यात अक्षरश: हाहाकार उडाला. अनेक वस्त्यांमध्ये पाणी घुसले. ११ जणांचा बळी गेला असताना या पूरग्रस्तांना दिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिकीटवाटपाची चर्चा करायला दिल्लीला गेले, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
पुण्यातील पूरपरिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तिकीटवाटपाला उशीर झाला तरी चालेल. आधी पुण्यातील पूरपरिस्थितीकडे लक्ष द्या, असा टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यासह आसपासच्या परिसराची दैना झाली आहे. अनेक संसार रस्त्यावर आले आहेत. गायी-गुरे वाहून गेली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, सरकारी पातळीवर याबद्दल फारशी हालचाल दिसलेली नाही. यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर तोफ डागली आहे. 'पुण्यात बिकट परिस्थिती आहे. मात्र, तेथील नागरिकांना दिलासा देण्याऐवजी, मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन बसले आहेत. मुख्यमंत्र्यांना फक्त निवडणुकांची काळजी आहे. जनतेबद्दल कळवळा नाही. पश्चिम महाराष्ट्रातील पुराच्या वेळीही मुख्यमंत्र्यांनी हेच केलं होतं,' असा आरोप त्यांनी केला आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. कोल्हापूर, सांगलीत पूरपरिस्थिती निर्माण झाली तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस महाजनादेश यात्रेत होते आणि आता पुण्यात अशीच परिस्थिती निर्माण झालेली असताना मुख्यमंत्री दिल्लीत तिकीटवाटपावर चर्चा करताहेत. निवडणुकीपुढे या सरकारला जनेतच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना वाºयावर सोडून मुख्यमंत्री दिल्लीला गेले, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
राज्यातल्या जनतेनं या सरकारचं नेमकं काय घोडं मारलंय, हेच कळत नाही.
-धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते
तिकीट वाटपाला उशीर झाला तरी चालेल. आधी पुण्यातील पूरपरिस्थितीकडे लक्ष द्या.
-छगन भुजबळ, राष्ट्रवादी