मुंबई : साई जन्मस्थळाच्या मुद्द्याची दाहकता वाढत असून शिर्डीत पुकारलेल्या बेमुदत बंदमध्ये पंचक्रोशीतील अनेक गावे सहभागी झाल्याचे रविवारी पाहायला मिळाले होते. दरम्यान साई जन्मभूमीच्या मुद्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुद्धा सुरु झाले आहेत. भाजपा नेते व माजी आमदार राम शिंदे यांनी याच मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
साई जन्मभूमीचा वाद हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेचं निर्माण झाला असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला आहे. तर कुठलाही शहानिशा न करता, कोणत्याही इतिहासाचे पुरावे नसताना सुद्धा राज्याच्या प्रमुखाने एखाद्या ठिकाणचा जन्मस्थळ म्हणून उल्लेख करणे हे चुकीचे असल्याचे सुद्धा राम शिंदे म्हणाले.
तर पुढे बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावरूनच हा वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी आधी आपले वक्तव्य मागे घेतेले पाहिजे, त्यांनतरचं चर्चा केली पहिजे असेही शिंदे म्हणाले.
तर हा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांना आज दुपारी चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात ही बैठक होईल. शिर्डी ग्रामस्थ, साई संस्थानचे अधिकारी, पाथरी येथील कृती समितीचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील.