'भाजपाला तंगड्यात तंगडं घालायची सवय; मला अनुभव नसल्यानेच ते अडचणीत आणताहेत!'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 03:40 PM2019-12-17T15:40:17+5:302019-12-17T15:59:01+5:30
महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात आनंदाचं वातावरण आहे
नागपूर: नागपूरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस होता. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी महाविकासआघाडीच्या विधिमंडळ पक्ष आमदारांची महत्वपूर्ण बैठक बोलवण्यात आली होती. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर काही वेळ वादळी चर्चा झाल्यानंतर सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आले होते. भाजपाच्या या भूमिकेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या बैठकीत टीका केली आहे.
महाविकासआघाडीतील प्रमुख नेते व आमदारांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. मला अनुभव नसल्यानं भाजपा अडचणी आणण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच भाजपाला तंगड्यात तंगड घालण्याची सवय असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात आनंदाचं वातावरण आहे त्यामुळे जनतेचं काम करा, त्यांचा भ्रमनिरास होईल असं काम करु नका असं आवाहन त्यांनी सर्व आमदारांना केले. तसेच गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून मोठा वाद सुरू आहे. या कायद्यामुळे देशभरात हिंसाचार घडत असताना आमदारांनी आपल्या मतदार संघात ही परिस्थिती निर्माण होऊ नये याची काळजी घेण्याचा सल्ला देखील उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे यांनी आज महाराष्ट्र विकास आघाडी विधिमंडळ पक्ष बैठकीत सर्व आमदारांना मार्गदर्शन केले.
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) December 17, 2019
Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray addressed the gathering of all MLAs of the Maharashtra Vikas Aghadi. pic.twitter.com/aecC1HqNYC
स्वातंत्र्य वीर सावरकरांबाबत आमची भावना होती ती आहे, कालही होती, आजही आहे, उद्याही तशीच राहेल, त्यात काही फरक पडणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं. माफी मागायला मी काही सावरकर नाही, राहुल गांधींनी असं म्हटल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे. राहुल गांधींच्या या विधानावरून आता भाजपानं त्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींच्या या विधानावरून शिवसेनेनंही आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातूनही राहुल गांधींना कडक शब्दांत इशारा दिला आहे. वीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे दैवत आहे. सावरकर नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरू, गांधी यांच्याप्रमाणेच सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी जीवनाचा होम केला असल्याचे सांगत त्यांचा सन्मान करायलाच हवा असं संजय राऊत यांनी स्पष्टीकरणं दिलं होतं.