“केंद्राला काय हवं ते करू द्या, शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 05:17 PM2021-07-01T17:17:44+5:302021-07-01T17:19:06+5:30
शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय घेणार नाही. राज्याचे हे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई:शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय घेणार नाही. राज्याचे हे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या. त्यांना कोणतेही कायदे करू द्या, मात्र शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार तुमच्यापाठी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. (cm uddhav thackeray assures that we will not take a decision that harm the interests of the farmer)
कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला. यावेळी नाशिक येथून दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. तर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे हे सह्याद्री अतिथीगृह येथे उपस्थित होते. राज्यातील शेतकरी कायमचा चिंतामुक्त व्हायला हवा आणि त्याच्यावर कर्जाचा डोंगर राहता कामा नये, असे सांगतानाच ज्या दिवशी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहील, त्या दिवशी राज्यात हरित क्रांती झाली असे म्हणता येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
शेतकरी राजा राज्याचे वैभव
शेतकरी राजा राज्याचे वैभव असून ते जपण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातुन केले जात आहे. शेती व्यवसायातील अनिश्चितता लक्षात घेऊन त्यात धाडसाने पाऊल टाकणाऱ्या बळीराजाला ताकद देण्याचे काम राज्य शासन करीत आहे. राज्यात दुष्काळ, पूर, गारपीट, कोरोना असे संकट आले, मात्र शेतकरी डगमगला नाही. सोन्यासारखे पिक नैसर्गिक आपत्तीत उद्धवस्त होत असते अशा वेळी शासन म्हणून पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम आम्ही करीत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
“शेतकऱ्यांना उकसवण्याचा प्रयत्न केला जातोय, ते योग्य नाही; कृषी कायद्यात बदल आवश्यकच”
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन कामकाजाची सुरुवात
आमचे सरकार आल्यानंतर त्याच्या कामकाजाची सुरुवात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन केली. कोरानाच्या संकटाला दीड वर्षापासून राज्य तोंड देत आहे. मात्र, या काळात शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्थेत जे योगदान दिले आहे, ते विसरता येण्यासारखे नाही. उद्योगाप्रमाणे शेतीतही नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जोन्नती केली पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने विकेल ते पिकेल ही योजना सुरु केली, असे ते म्हणाले.
हमी भाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे
शेतकरी जे पिकवेल ते विकले गेले पाहिजे. त्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईकांची परंपरा पुढे नेत असतानाच राज्यातील शेतकरी हिताला धक्का लागेल, अशी एकही बाब राज्यात होऊ देणार नाही, असे नमूद करत शेतकऱ्यांनी प्रयोगशिलता जपली पाहिजे. मर्यादित स्वरुपात प्रयोग करीत राहिले पाहिजे. त्या प्रयत्नांना बळ देण्याचे काम एकत्रितपणे केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.