कोल्हापूर: गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका राज्याला बसला आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्राचं पावसामुळे मोठं नुकसान झालं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते कोल्हापुरच्या दौऱ्यावर आहे. आज शाहुपुरीतील चौकात दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. काही मिनिटं दोघांनी संवाद साधला. या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांना विशेष मेसेज पाठवल्याची माहिती आता पुढे आली आहे.
पुराचा फटका बसलेल्या शाहुपुरीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते आज कोल्हापुरात आहेत. त्यांची आज शाहुपुरीतील एका चौकात भेट झाली. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी त्यांना निरोप पाठवला होता, अशी माहिती समोर आली आहे
मी शाहुपुरीत येत आहे. त्यामुळे तुम्ही शहापुरीतच थांबा. पूरग्रस्त भागाची वेगवेगळी पाहणी करण्यापेक्षा एकत्रच पाहणी करू, असा संदेश मुख्यमंत्री ठाकरेंनी त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून फडणवीसांना पाठवला होता. त्यामुळे शाहुपुरीतून निघण्याच्या तयारीत असलेल्या फडणवीसांनी थांबण्याचा निर्णय घेतला. यानंतर शाहुपुरीतील एका चौकात दोन्ही नेत्यांची भेट झाली. त्यांनी काही वेळ एकमेकांसोबत चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना भेटीसाठी निरोप पाठवला होता अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली. 'देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जनतेच्या मनात खूप विश्वास आहे. ते न्याय देतील अशी अपेक्षा लोकांना वाटते. तुम्ही मुख्यमंत्री असताना काढलेल्या जीआरप्रमाणे आम्हाला मदत मिळाली तरी खूप होईल, अशी अपेक्षा अनेकांनी फडणवीसांकडे व्यक्त केली,' असं दरेकर यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी निरोप पाठवल्यानं आजी माजी मुख्यमंत्र्यांची शाहुपुरीत भेट झाल्याची माहिती त्यांनी दिली.