मुंबई: विधानसभा निवडणुकीवेळी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी राज्याला मजबूत विरोधी पक्ष मिळावा असं म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावाचं ते स्वप्न पूर्ण केलं, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. राज ठाकरेंना मजबूत विरोधी पक्ष हवा होता. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावाची मागणी पूर्ण केली, असा चिमटा काढत भुजबळांनी फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी छगन भुजबळांनी जोरदार टोलेबाजी केली. आम्ही विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. सरकारला १६९ आमदारांचा पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्षानं ही गोष्ट लक्षात घ्यावी. आता विरोधकांनी आम्हाला काम करण्याची संधी द्यावी. त्यासाठी रात्रीचे खेळ बंद झाले तर बंद होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी कोपरखळी मारली. रात्रीचे खेळ करणारे करणारे नेते विरोधी पक्षात असल्यानं ही भीती व्यक्त करत असल्याचं ते पुढे म्हणाले. सत्ता असताना काहींनी माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मला राग नाही. माझा आवाज त्यामुळे कमी होणार नाही. सभागृहात असतो, तितकाच तो बाहेरदेखील असतो. असं भुजबळ यांनी म्हटलं. मी पुन्हा येईन यावरुनही भुजबळांनी फडणवीसांना टोला लगावला. आपण परत आलात. तुम्ही शब्द खरा करुन दाखवलात. विरोधी पक्षनेते हे मोठं पद आहे. तुमच्याकडे मंत्रिपदाचा दर्जा आहे. विरोधी पक्षनेत्याला अनेकांना अंगावर घ्यावं लागतं. नंतर त्याचा त्रास होतो. मात्र त्याशिवाय जनतेला न्याय देता येत नाही, याची मला जाणीव नाही. मी त्या पदावर काम केलं आहे, असं भुजबळ म्हणाले.
शेवटी उद्धव ठाकरेंनी पूर्ण केली भावाची इच्छा; भुजबळांच्या फडणवीसांना अनोख्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2019 3:02 PM