पुणे: काही चांगल्या गोष्टी घडण्यासाठी वेळ जुळून यावी लागते. आता ती वेळ जुळून आली आहे. महाराष्ट्रात अगदी योग्य वेळी आपली सत्ता आली आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषिक प्रदर्शनाचं मुख्यमंत्र्यांनी आज उद्घाटन केलं. यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना शरद पवारांच्या बारामतीमधल्या कामाची मुक्तकंठानं प्रशंसा केली. यावेळी उद्धव यांनी घड्याळावरुन जोरदार फटकेबाजी केली. शरद पवारांचं तोंडभरुन कौतुक करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी शेतीतल्या नव्या तंत्रज्ञानावरदेखील भाष्य केलं. यावेळी त्यांनी चंद्रपुरातल्या एका शेतकऱ्याचं उदाहरण दिलं. चंद्रपुरातल्या एका शेतकऱ्यानं अतिशय मेहनतीनं तांदळाचं वाण शोधून काढलं. त्यावेळी त्याच्या हातावर एचएमटीचं घड्याळ होतं. त्यामुळे त्या वाणाला त्यानं एचएमटी नाव दिलं. शेवटी त्याच्या हातात घड्याळ होतं ना, असं म्हणत उद्धव यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शरद पवारांकडे पाहिलं. यानंतर कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी घड्याळाबद्दलचा आणखी एक किस्सा सांगितला. 'सुप्रिया सुळे मला विचारत होत्या की तुमचं घड्याळाचं दुकान आहे का? मी त्यांना उत्तर दिलं, माझं घड्याळाचं दुकान नाही. पण घड्याळवाले माझे पार्टनर आहेत.' उद्धव यांनी हा किस्सा सांगितल्यानंतर पुन्हा एकदा सभास्थळी खसखस पिकली. अनेकदा चांगली कामं होण्यासाठी वेळ जुळून यावी लागते. आपलं सरकार अगदी योग्य वेळी राज्यात सत्तेवर आलं आहे, असं उद्धव पुढे म्हणाले.
...अन् उद्धव ठाकरे सुप्रिया सुळेंना म्हणाले, घड्याळवाले आमचे पार्टनर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 1:46 PM