मुंबईः मुख्यमंत्रिपदाच्या समसमान वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपा-शिवसेना युती तुटली असली, या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीकेचे बाण सोडत असले, तरी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधीही थेट लक्ष्य केलेलं नाही. जुने मित्र असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर ते टीका-टिप्पणी करतात, पण नरेंद्र मोदींसोबतचं भावाभावाचं नातं जपण्याचा प्रयत्न ते सातत्याने करतात. त्याचाच प्रत्यय आज ‘सामना’मधील उद्धव ठाकरेंच्या ‘अनलॉक्ड’ मुलाखतीतूनही आला. नरेंद्र मोदी राज्याला मदत करत असल्याचं उद्धव ठाकरेंनी प्रांजळपणे सांगितलं.
कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था साफ कोलमडली आहे. अनेक उद्योग बंद झाल्यानं तरुणांवर, मजुरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अगदी, सरकारी नोकऱ्यांमधूनही कर्मचारी कपात केली जात असल्याचं चित्र आहे. पगार कसा, कुठून द्यायचा हा प्रश्नही प्रशासनाला सतावतोय. दूध दरवाढीसाठी झालेल्या आंदोलनानं शेतकऱ्यांच्या समस्याही समोर आल्यात. या पार्श्वभूमीवर, केंद्राकडून राज्य सरकारला होत असलेल्या मदतीबाबत ‘सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी केंद्र सरकारची बाजू सांभाळून घेतल्याचं पाहायला मिळालं.
शरद पवारांच्या राम मंदिराबाबतच्या विधानाला उद्धव ठाकरेंची बगल; थेट बोलणं टाळलं
कोरोनासोबत जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं?...खुद्द मुख्यमंत्र्यांनीच समजावलं
केंद्र आणि राज्य यांना एकत्रित काम करावंच लागेल. पंतप्रधान मोदी अधेमधे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घेत असतात आणि कोरोनाच्या बाबतीत आपण ज्या काही गोष्टी त्यांच्याकडे मांडतो, त्याबाबत त्यांची मदत होते, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. केंद्राने राज्याला जी ३८ हजार कोटींची मदत द्यायचं मान्य केलं होतं, ते पैसेही हळूहळू येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. सगळ्यांचंच उत्पन्न घटलेलं आहे, दूध उत्पादकांचं घटलंय, शेतकऱ्यांचं घटलंय, म्हणजे सरकारचंही घटलं आहे, याकडे त्यांनी आवर्जून लक्ष वेधलं.
कृपया 'त्या' आकड्यांकडे लक्ष देऊ नका; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कोरोनाचं 'अंकगणित'
डॉक्टर व्हावंसं वाटायचं, नाही झालो ते बरंच झालं; उद्धव ठाकरेंचं 'होमिओपॅथी कनेक्शन'
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांच्या दिल्लीवारीवर खोचक टिप्पणी केली. आमदारकीचा महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिल्यामुळे ते सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करताहेत, असा टोला त्यांनी लगावला. कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली, ही कदाचित त्यांची पोटदुखी असेल, असा चिमटाही उद्धव ठाकरेंनी काढला.
कदाचित ती त्यांची पोटदुखी असेल; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
मी घरात बसून सगळीकडे जातोय, अख्खं राज्य कव्हर करतोय; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं