बारामती: काही जण फक्त मोठंमोठं तत्वज्ञान सांगतात. पण बारामतीमधल्या कृषी प्रदर्शनात सर्व गोष्टींची प्रात्यक्षिकं पाहायला मिळतात, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचं कौतुक केलं. बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कृषिक प्रदर्शनाचं मुख्यमंत्र्यांनी आज उद्घाटन केलं. यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधताना शरद पवारांच्या बारामतीमधल्या कामाची मुक्तकंठानं प्रशंसा केली. मी याआधीही अनेक प्रदर्शनं पाहिली आहेत. मात्र आज बारामतीमधल्या प्रदर्शनाला आलो नसतो, तर मोठ्या अनुभवाला मुकलो असतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या बारामतीमधल्या कामाचं तोंडभरुन कौतुक केलं. काही जण फक्त मोठंमोठं तत्त्वज्ञान सांगतात. मात्र इथं प्रात्यक्षिकं पाहायला मिळतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले. या विधानातून उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्याचं बोललं जात आहे. इवलेसे रोप लाविले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याचा जिवंत अनुभव बारामतीत येतो, अशा शब्दांत उद्धव यांनी शरद पवारांवर स्तुतीसुमनं उधळली. 'एका माळरानावर पवारांनी नंदनवन उभं केलं. त्यांच्या या कामाचं कौतुक व्हायलाच हवं. आमचे राजकीय मतभेद असू शकतात. पण झालेलं काम नाकारणं हा करंटेपणा झाला. तो मी करणार नाही,' असं उद्धव यांनी म्हटलं. शेतकऱ्यांनी नवं तंत्रज्ञान स्वीकारायला हवं. काही शेतकरी तर स्वत: अतिशय कल्पकतेनं नवे शोध लावत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी चंद्रपूरमधल्या एका शेतकऱ्याचं उदाहरण दिलं. चंद्रपुरातल्या एका शेतकऱ्यानं अतिशय मेहनतीनं तांदळाचं वाण शोधून काढलं. त्यावेळी त्याच्या हातावर एचएमटीचं घड्याळ होतं. त्यामुळे त्या वाणाला त्यानं एचएमटी नाव दिलं. शेवटी त्याच्या हातात घड्याळ होतं ना, असं म्हणत उद्धव यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या शरद पवारांकडे पाहिलं. यानंतर कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला.
काही जण फक्त मोठमोठं तत्वज्ञान सांगतात; पवारांच्या बारामतीतून मुख्यमंत्र्यांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 12:50 PM