CM Uddhav Thackeray: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारामतीत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामतीत इन्क्युबेशन सेंटरचं उदघाटन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) देखील उपस्थित होते. राज्यात सध्या एकाच वेळी महाविकास आघाडीला दोन धक्के बसले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केली आहे. तर अजित पवार यांच्याशी संबंधित मालमत्तांवर आयकर विभागानं छापे टाकले आहेत. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री आजच्या भाषणात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. कार्यक्रम अराजकीय असला तरी मुख्यमंत्र्यांनी नेमक्या शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला आहे.
इन्क्युबेशन सेंटर आणि बारामतीत आजवर पवार कुटुंबानं केलेल्या कामाचं उद्धव ठाकरे यांनी तोंडभरुन कौतुक केलं. इन्क्युबेशन सेंटरला मराठीत उबवण्याचं केंद्र म्हणतात. आम्हीदेखील २५ वर्षे हे सेंटर चालवलं. त्यात नको ती अंडी उबवली. त्यांचं पुढे काय झालं ते तुम्ही पाहिलंत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपसोबतच्या २५ वर्षांच्या युतीवर खोचक भाष्य केलं. तसंच भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांच्या दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याच्या विधानाचाही समाचार घेतला.
"कुणीतरी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याची भाषा करतं आहे. त्यांनी बॉम्ब तर फोडावाच पण त्याचा आवाजही येऊ द्यात. नुसता धूर काढू नका", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फडणवीसांचं नाव न घेता म्हणाले.
पवारांना केवळ विकासाचा ध्यासशरद पवार आणि कुटुंबीयांना केवळ विकासाचा ध्यास आहे. देशाच्या राजकारणातील तरणेबांड शरद पवार आजही थांबत नाहीत. त्यांनी केलेलं इथलं काम नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. ५० वर्षांपूर्वीचं बारामती आणि आताचं बारामती यातील फरकच पवार कुटुंबाचं इथलं काम दाखवून देतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. इब्युटेशन सेंटरची इमारत दाखवण्यासाठी आपल्या दोन्ही मुलांना इथं घेऊन येणार असल्याचंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
टीकाकर असलेच पाहिजेत. पण चांगल्या कामात अडथळे आणणं ही आपली संस्कृती नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरेंची आठवण सांगितली. आम्ही शरद पवारांचे टीकाकार होतो. पण तरीही शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री होती. शरद बाबू बारामतीत काय करतात, ते जाऊन पाहायला हवं, असं बाळासाहेब म्हणायचे. हीच आपली संस्कृती आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.