राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवनात पार पडली. यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील आक्रमक भूमिका घेत शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. शिवसेना एक निखारा आहे, त्यावर पाय ठेवाल तर जळाल असा इशारादेखील त्यांनी दिला.
स्वत:च्या बापाच्या नावानं मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले. बंडखोरांना त्यांचा निर्णय आधी घेऊ द्या, माझ्यावर शिवसैनिकांचं अधिक प्रेम आहे, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. दरम्यान, कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी उपस्थितांनी गद्दारांना परत घेऊ नका अशी मागणी केली. यावर उत्तर देताना त्यांना परत घेणारच नसल्याचं स्पष्ट केलं.