मुंबई : बनावट चिनी मालाप्रमाणे भाजपवाले बनावट हिंदुत्ववादी आहेत. मनीलाँड्रिंगप्रमाणे भाजपमध्ये ह्युमन लाँड्रिंग चालते. भ्रष्ट नेत्यांना धुऊन घेतात, अशी शेलकी टीका शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दुसरीकडे असताना भ्रष्टाचारी आणि तुमच्याकडे आल्यावर गोमूत्र शिंपडल्यावर पवित्र झाला का, असा प्रश्न त्यांनी केला. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र व कोकणात दि. २६ ते २९ मे या दरम्यान शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांशी व्हीसीच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला. विक्रांत निधीमध्ये घोटाळा करणारे भ्रष्टाचाराचे मेरुमणी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. आम्ही हिंदुत्वाच्या विरोधात आहोत, असे सांगत आहेत. तुमची ओळख नसताना, तुम्हाला काडीची किंमत नसताना मांडीवर घेतले आणि आम्ही या नकली व बनावट हिंदुत्ववाद्यांना पोसले. देशाच्या शत्रूंपेक्षा पक्षाचे शत्रू संपविण्याचे काम सुरू आहे, अशा शब्दात ठाकरे यांनी भाजपला सुनावले.
कितीही अडचणी येऊ द्या, महाराष्ट्र धर्म फडकणारच कितीही अडथळे आणि संकटं येऊ देत, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकविल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. माझे सर्वांना, अगदी विरोधी पक्ष आणि संघटना यांनादेखील कळकळीचे आवाहन आहे की, मनात विद्वेष न ठेवता महाराष्ट्राचा देशातच नव्हे तर जगात डंका वाजविण्यासाठी एकत्र येऊन महाराष्ट्राची पताका हातात घेऊयात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.