जव्हार : आता जव्हारलाही धावपट्टी उभारू. मग हवी तेवढी विमाने उडवा, असा उपरोधिक टोला राज्यपालांना लगावत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जव्हार दौऱ्यात पालघर जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेतला. बंद दाराआड झालेल्या चर्चेतील सर्व तपशील मी उघड करतो, असा चिमटा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना काढला. ठाकरे यांनी सकाळी जव्हार प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, धरणांची उंची वाढवणे, प्रकल्पांची दुरुस्ती यावर त्यात चर्चा झाली. तसेच ढापरपाडा, जव्हारचे कुटीर रुग्णालय, जामसर प्राथमिक आरोग्य केंद्र, खरवंद येथील घरकुलाची त्यांनी पाहणी केली आणि रुग्णांची विचारपूस केली. या वेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुनील भुसारा, आमदार रवींद्र फाटक, श्रीनिवास वनगा आदी उपस्थित होते.त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मला पालघरचा सर्वांगीण विकास करायचा आहे. केवळ जिल्हा घाेषित करून, जिल्हा कार्यालय स्थापणे आणि रुग्णालय उभारणे पुरेसे नाही. येथील समस्या मुळापासून संपवायला हव्यात. येथील आरोग्य व्यवस्था मजबूत केली जाईल. आदिवासींची संस्कृती जपत, उद्योग-पर्यटन यांचा एकत्रित विकास करावा लागेल. जव्हार हे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित झाले पाहिजे.
कुपोषणाचा संदर्भ देत कोवळी पानगळ थांबवावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात पर्यटनाचा विकास व त्या माध्यमातून रोजगारवृद्धी करणार असल्याचे सांगून ते म्हणाले, उद्योग आणि पर्यटनाच्या विकासात आदिवासींना संधी दिली जाईल. ‘वारली चित्रकलेत करावा विविध रंगांचा समावेश’प्राथमिक आरोग्य केंद्रात राहुल श्रीराम सहाणे (रा.मोर्बे) यांनी काढलेली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची रांगोळी पाहून त्याचे व कलाशिक्षक प्रवीण अवतार यांचे ठाकरे यांनी कौतुक केले. वारली चित्रकलेत अनेक रंगांचा समावेश करून ती अधिक लोकप्रिय करता येईल, असे ठाकरे म्हणाले.