मुंबई: कोरोना संकट काळापासून काही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्याचाच एक भाग बनल्या आहेत. यापैकी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मास्क. कोरोनाच्या तिन्ही लाटांवर नियंत्रण मिळविण्यात राज्य शासनासह स्थानिक यंत्रणांना यश आले आहे. त्यानंतर आता राज्य वेगवेगळ्या निर्बंधातून मुक्तही होत आहे. अशा स्थितीत आता मास्कमुक्ती कधी मिळणार? या विचाराने सर्वच जण चिंतेत आहेत. यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी एक सूचक विधान केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध शिथील होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यातच कोरोना आणि मास्कमुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाचे विधान केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अलिबागमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
महाराष्ट्राला मास्कमुक्ती कधी मिळणार?
यावेळी राज्याला मास्कमुक्ती कधी मिळणार, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारणा करण्यात आली. त्यावर बोलताना, कोरोना अद्याप संपलेला नाही. त्याबाबत आताच काही सांगता येणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील लसीकरण वाढवण्यावसंदर्भात सूचना दिल्या. आपल्याला आता जो काही वेळ मिळाला आहे, तो लसीकरण वाढवण्यासाठी उपयुक्त आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. साथ शिखरावर असताना, लसीकरण करणे कितपत योग्य आहे, हे डॉक्टर आपल्याला सांगतीलच. पण आता लाट कमी होत असताना, लसीकरण वाढवणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
या जिल्ह्याला चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न आहे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात या वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाचे भूमिपूजन होत आहे. शिवरायांच्या भूमीत आधुनिक सोयीसुविधा असलेले वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय उभे करत आहोत. मागण्या अनेक असतात. नुसत्या मागण्या करून काही होत नाही. त्याच्या पूर्णत्वासाठी पाठपुरावा करावा लागतो. आदिती तटकरे यांनी याचा पाठपुरावा केला. गेल्या दोन वर्षांत रुग्णालयांचे नुतनीकरण, नवीन हॉस्पिटलचे उद्घाटन आदी जास्तीत जास्त कामे महाराष्ट्रात झाली. आरोग्य सेवेला ब्रेक न लावता त्यात सातत्याने वाढ करावी लागली. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याने या आव्हानात्मक परिस्थितीत आरोग्य सुविधांमध्ये प्रचंड वाढ केली, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.