मुंबई: आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. त्यानिमित्ती शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. यावेळी शिवसेनेचे अनेक नेते आणि मंत्रीही उपस्थित आहेत. त्यात मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, आदेश बांदेकर यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आज आपण खुप दिवसांनी समोरासमोर आलो आहोत. गेल्यावर्षी राज्यभर शिवसंपर्क मोहिम राबवायची ठरवलं, पण दुसरी लाट आली. त्यानंतर माझं दुखन सुरू झालं आणि आता कोरोनाची तिसरी लाट आली आहे. या कोरोनाच्या लाटामागून लाटा येताहेत, पण आपल्याला शिवसेनेची लाट आणायची आहे. आपल्याकडे भगव्याचा वारसा आहे. दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न बाळासाहेबांनी दाखवलं, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आजचा दिवस म्हणजे सर्वांसाठी सण आहे. मी लहानपणापासून पाहतोय, दरवर्षी शेकडो लोक मातोश्रीवर यायचे. पण, आज आपण प्रत्यक्षात भेटू शकत नसलो तरी ऑनलाइन भेटू शकतो. शेकडो हजारो लोक मला पाहू आणि ऐकू शकतात.
लवकरच बाहेर पडणार आणि महाराष्ट्र पिंजून काढणार
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला. मी आता आजारी आहे, पण लवकरच बाहेर पडणार आणि महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. भगव्याचे तेज आहे, हेच तेज विरोधकांना दाखवणार, या तेजानेच त्यांचा अंत होईल. हे काळजीवाहू विरोधक एकेकाळी आपले मित्र होते, आपण त्यांना पोसलं. मी मागे बोललो होतो, पंचवीस वर्षे आपली युतीमध्ये सडली, ते आजही बोलतोय. विरोधकांना राजकारणाचं गजकरण झालंय. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेस दिशा दाखवली, हिंदुत्वाची दिशा दाखवली. पण, विरोधकांचे पोकळ हिंदुत्व आहे. त्यांनी हिंदुत्वाचे काताडे पांघरले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केला.
भाजप म्हणजे हिंदुत्व नाही
ते पुढे म्हणाले की, अनेकजण आपल्यावर टीका करतात की, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं. पण आम्ही भाजपला सोडलं आहे, हिंदुत्व नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही. विरोध म्हणतात हा लोकशाहीचा अपमान आहे. आम्ही शिवसैनिक आहोत, मर्द आहोत. आमची एकट्याने लढण्याची तयारी आहे, वेळ पडली तर बघू. अमित शहा पुण्यात येऊन आव्हान देतात आणि केंद्रीय यंत्रणाची पीडा मागे लावतात.
भाजपचे सोईचे राजकारण
कधीकाळी भाजपचे डिपॉझिट जप्त होत होते, त्यावेळेस त्यांनी स्थानिक पक्षांची मदत घेतली. त्यांनी अनेक पक्षांची मदत त्यावेळेस घेतली. आम्ही त्यांना भगव्यासाठी साथ दिली, पण आता ते हिंदुत्व स्वार्थासाठी करत आहेत. सत्तेसाठी इकडे हिंदुत्ववादी पक्षासी युती करतात, तर कधी महेबुबा मुफ्तीसोबत युती करतात. तर कधी संघ नको म्हणणाऱ्या नितीश कुमारांशी युती करतात. यांचे हे सोईसाठी राजकारण सुरू आहे. आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत युती केली होती, पण आता यांचे हे हिंदुत्व खरे हिंदुत्व नाही.
...म्हणुन काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली
भाजपने पोकळ हिंदुत्व केलं आहे. विविध राज्यात सोईचे राजकारण करतात. त्यांनी हिंदुत्वासाठी काही राज्यात गोवंश हत्या बंदी केली तर काही राज्यात ही सुरू ठेवली आहे. हे म्हणतात आम्ही लोकशाहीचा अपमान केला. पण, तुम्ही आम्हाला गुलामाची वागणुक दिली. तुम्ही आम्हाला दिलेलं वचन मोडलं, त्यामुळेच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. पण, आम्ही तुमच्यासारखी सकाळी चोरुन नाही तर संध्याकाळी शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने हजारो लोकांसमोर शपथ घेतली.