मुंबई: कोरोनापासून राज्यातील जनतेचा बचाव वाचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. यापुढेही सरकार आवश्यक त्या सगळ्या गोष्टी करेल. पण नागरिकांना काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. गर्दी टाळावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. त्यांनी आज राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. अनेक जण मास्क न घालताच सध्या वावरत आहेत. कोरोना अद्याप गेलेला नाही. त्यामुळे अशी ढिलाई परवडणारी नाही, असंदेखील ते पुढे म्हणाले.गेल्या अनेक महिन्यांपासून जनतेकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. 'गेल्या आठ महिन्यांत अनेक सण येऊन गेले. मात्र आपण ते अतिशय साधेपणानं साजरे केले. गर्दी टाळली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला. जनतेकडून मिळालेल्या या सहकार्याला तोड नाही. त्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. यापुढेही सर्वांकडून अशाच प्रकारचं सहकार्य मिळेल,' अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
राज्यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा १८ लाखांच्या जवळराज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ७५३ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांचा आकडा १७ लाख ८० हजार २०८ वर पोहोचला. गेल्या २४ तासांत ५० जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ६० जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १६ लाख ५१ हजार ६४ जणांनी कोरोनावर मात केली असून सध्याच्या घडीला ८१ हजार ५१२ जणांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ४६ हजार ६२३ जणांचा मृत्यू झाला आहे.