मुंबई – कोरोनामुळे आमदारांना देण्यात येणाऱ्या निधीवर निर्बंध ठेवले होते. परंतु आता परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. दरवर्षी विकासकामांसाठी आमदारांना निधी दिला जातो. हा निधी मतदारसंघातील कामांसाठी वापरण्यात येतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेचे आमदार असल्याने त्यांचा आमदार निधी कुठल्याही मतदारसंघात वापरला जाऊ शकतो.
आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच आमदार निधीचा वापर केला आहे. स्थानिक विकास निधी योजनेतंर्गत ही रक्कम मुख्यमंत्र्यांनी दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील शुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आहे. २२ एकरात पसरलेल्या छ. शिवाजी महाराज पार्कचे आणि शिवसेनेचे ऐतिहासिक नातं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या पार्कला शिवतीर्थ म्हणून संबोधत असतं. १९६६ मध्ये याच शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली होती. शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही याच शिवतीर्थावर झाले होते.
शिवतीर्थापासून हाकेच्या अंतरावर शिवसेना भवन आहे. त्यामुळे शिवसेनेचा आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मैदानाच्या शुशोभिकरणासाठी जिल्हा स्थानिक विकास योजनेतून निधी दिला आहे. याबाबत १९ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे जिल्हाधिकारी राजीव निवाटकर यांना पत्र पाठवलं होतं. या पत्रात म्हटलं होतं की, शिवाजी पार्क परिसरातील फुटपाथचा वापर अनेक ज्येष्ठ मंडळी, स्थानिक नागरिक आणि खेळाडू करत असतात. परंतु याठिकाणी फुटपाथ योग्य स्थितीत नसून त्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी मी माझ्या आमदार निधीतून १ कोटी २५ लाख रुपये फुटपाथ दुरुस्ती आणि शुशोभिकरणासाठी देत आहे.
मुख्यमंत्र्यांनी आमदार निधीतून पैसे दिल्यानंतर महापालिकेने आता याकामासाठी निविदा मागवली आहे. त्यामध्ये विद्युत दिवे, पथदिवे, रोषणाई, पुतळ्यावरील स्पॉट लाईट्स आणि इतर शुशोभिकरणाची कामं केली जाणार आहेत. विशेष म्हणजे एखाद्या आमदाराला या कामासाठी २५ लाखांचा निधी दिला जातो. परंतु मुख्यमंत्र्यांच्या प्रकरणात त्यांना विशेष सवलत म्हणून १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. या निधीतून संयुक्त महाराष्ट्र गॅलरीचंही शुशोभिकरण केले जाणार आहे.
मनसेवर कुरघोडी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर शिवसेनेचा दादर आणि शिवाजी पार्क परिसरातील प्रभाव थोडा कमी झाला होता. याठिकाणी २०१२ च्या निवडणुकीत मनसेचे सर्व नगरसेवक निवडून आले होते. दादर येथील शिवसेनेचा पराभव खुद्द बाळासाहेब ठाकरेंच्याही जिव्हारी लागला होता. त्यानंतर २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने इथं पुन्हा कमबॅक केले. परंतु दादर आणि शिवाजी पार्क परिसरात मनसेचेही वर्चस्व कायम आहे. स्थानिक आमदार, नगरसेवक शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरातील शुशोभिकरणाच्या निमित्तानं शिवसेनेने या भागात त्यांचा प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.