मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुण्याला जाऊन सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन आग लागलेल्या युनिटच्या घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. उद्या दुपारी मुख्यमंत्री घटनास्थळी जाऊन पाहणी करतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील इमारतीला आज दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सीरमच्या इमारतीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी दिली. "सीरमच्या बीसीजी लस बनवण्याच्या इमारतीला दुपारी दोनच्या सुमारास आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बीसीजी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे. बिल्डिंगचं काम सुरू होतं. वेल्डिंग स्पार्कमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. आता आग विझवण्यात आली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृतदेह नोबेल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत,' असं टोपेंनी सांगितलं. कोरोना लसीची निर्मिती जिथे होते, ती इमारत घटनास्थळापासून लांब आहे. त्यामुळे कोरोना लसीचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. यासंदर्भात पोलीस तपास सुरू आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, 'आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या इमारतीचे बांधकाम सुरु होते. तिथे विजेचे आणि वेल्डिंगचे काम सुरु होते, त्यादरम्यान ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मृतांमध्ये इमारतीचे बांधकाम करणारे कंत्राटी कामगार असू शकतात.'सीरम इन्स्टिट्यूट मोठी लस उत्पादक कंपनीजगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असा सीरम इन्स्टिट्यूटचा नावलौकिक आहे. काही दिवसांपूर्वीच सीरमने कोरोना प्रतिबंधक असलेली कोविशिल्ड लस देशभरात वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. कोविशील्डच्या लसीकरणाची मोहीम देशात सुरू आहे. तसेच, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लस उत्पादन करण्यासाठी सीरम कंपनी प्रयत्नशील आहे.