मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली; काँग्रेस-राष्ट्रवादीलाही सतावतेय भीती, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 07:57 AM2021-10-03T07:57:43+5:302021-10-03T08:00:20+5:30
खड्ड्यांचे हादरे मातोश्रीवरून वर्षावर...वर्षा बंगल्यावर डेरेदाखल झाल्यावर खड्ड्यांचा ससेमिरा सुटेल असे वाटले होते. पण, पहिले वर्ष कोरोनातच गेल्याने खड्ड्यांची तीव्रता जाणवली नाही
तब्बल तीन दशके मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना नेतृत्वाला नाले आणि खड्ड्यांनी भलतेच छळले. खड्ड्यांवरून वैतागलेल्या मुंबईकरांच्या संतापाचे हादरे मातोश्रीपर्यंत जाणवत. ‘नेमेचि येतो मग पावसाळा..’ म्हटल्याप्रमाणे खड्डे आणि त्याचे हादरे सवयीचे झाले होते. खड्ड्यांतील रस्त्यांतून जाताना कंत्राटदार, भ्रष्टाचार वगैरेंनी मातोश्रीकरांची पाठ कधी सोडली नाही. या आरोपांचे धक्के बसले तरी पालिकेचा ताबा सुटणार नाही याची खास तजवीज मातोश्रीकरांनी केली होतीच. महाविकास आघाडीच्या प्रयोगाने मातोश्रीकर वर्षावासी झाले.
वर्षा बंगल्यावर डेरेदाखल झाल्यावर खड्ड्यांचा ससेमिरा सुटेल असे वाटले होते. पण, पहिले वर्ष कोरोनातच गेल्याने खड्ड्यांची तीव्रता जाणवली नाही. यंदा मात्र थोडी उघडीप मिळाली आणि पार न्यायालयापासून सगळेच खड्ड्यांच्या मागे लागले. मुंबईतल्या खड्ड्यांचा खुलासा करताना मातोश्रीकरांना बरीच कसरत करावी लागायची. त्याचा पुढचा किस्सा आता वर्षावर बसून करावा लागत आहे. उलट, मुंबईतल्या खड्ड्यांचे खापर इतर प्राधिकरणांवर फोडायची सोयसुद्धा वर्षावर आल्यापासून राहिली नाही. त्यामुळे कंत्राटदारांची गय करणार नाही, अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, ही अनेक वर्षांची भाषा आताही कायम आहे.
इतकी वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे मुंबईतले शिलेदार खड्ड्यांवरून मातोश्रीला टार्गेट करायचे. पुरावे, फोटो, सेल्फी काढत मातोश्रीकरांना आव्हान दिले जायचे. आता मात्र यातले काही करायची सोय पंजा आणि घड्याळाकडे उरली नाही. उलट, खड्ड्यांचे दुखणे विनाकारण आपल्या पाठीवर बसते की काय, ही भीती मात्र त्यांना आता सतावू लागली आहे.
भुज‘बळां’नाच थेट आव्हान...
एकेकाळी एकत्र नांदणारे किंवा बरोबर राहणारे नंतर मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतात हा राजकीय इतिहास नवा नाही. कोणे एकेकाळी राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांच्या छत्रछायेत वावरणारे सुहास कांदे नंतर बाजूला गेले आणि शिवसेनेत प्रवेश करून थेट आमदारही झाले आणि आता त्यांनी विकासकामांवरून भुजबळ यांच्याशी वाद सुरू केला. तो इतका विकोपाला गेला की कांदे आणि भुजबळ यांच्यात शाब्दिक सामना रंगला आहे. भुजबळांचे पालकमंत्रिपद काढून घ्यावे यासाठी त्यांनी उच्च न्यायलयात दाद मागितली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्याला याच प्रकरणात छोटा राजनकडून धमकी आल्याचा आरोप केला आहे.
हा आरोप खोडताना भुजबळ यांनी मी ‘भाई युनिव्हर्सिटी’चा विद्यार्थी नसल्याचे सांगितले तर कांदे यांनी ते भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नसून प्राचार्य असल्याचे म्हटले. नाशिकमध्ये मुक्त विद्यापीठ आणि आरोग्य विद्यापीठ आहे, आता हे काेणते तिसरे विद्यापीठ म्हणून नाशिककर बुचकळ्यात पडले आहेत. मूळ प्रश्न हाच आहे की, कांदे एवढे का रागावले? कांदे हे नांदगाव मतदारसंघातून छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांना पराभूत करून निवडून आले आहेत. त्यातच आता महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र असले तरी हीच स्थिती आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहिल्यास दावेदार कोण, असाही एक प्रश्न आहे. साहजिकच कांदे यांच्यात असुरक्षिततेची भावना वाढीस लागल्याचे सांगण्यात येते. अर्थात वाद निधीवरून सुरू झाला आणि ‘भाईगिरी’पर्यंत येऊन थांबला आहे, हे नवलच.