मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांची महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे.महारेराच्या अध्यक्षपदी मेहता यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला असून ते पुढील आठवड्यात सूत्रे हाती घेतील. मेहता यांना मुख्य सचिव म्हणून आधीच्या देवेंद्र फडणवीस सरकारने तसेच सध्याच्या महाविकास आघाडी सरकारनेदेखील मुदतवाढ दिली होती. जून २०१९ मध्ये ते मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आणि लगेच मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना आपले प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त केले. मुख्य सचिवपदी राहिलेल्या व्यक्तीची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती होण्याची ही राज्याच्या इतिहासातील पहिलीच वेळ.मुंबईसह राज्यात रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती देण्याचे आव्हान मेहता यांच्यासमोर आहे. महारेराच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थांच्या सदस्यांना न्याय देणे तसेच विकासकांच्या समस्या सोडवणे अशी दुहेरी जबाबदारी त्यांच्यावर राहील.
मुख्यमंत्र्यांचा भरवसा हाय ना! 'या' अधिकाऱ्याकडे ठाकरेंनी पुन्हा दिली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 07:15 IST