गाफील राहू नका! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सल्ला; कोल्हापूरसाठी आघाडीची रणनीती ठरली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 10:34 AM2022-03-22T10:34:55+5:302022-03-22T10:35:31+5:30
‘कोल्हापूर उत्तर’च्या जागेवर राजेश क्षीरसागर यांनी दावा सांगितला होता. मात्र, आघाडीच्या सूत्रानुसार ही जागा काँग्रेसला देण्यात आली. त्यामुळे क्षीरसागर काहीसे नाराज होते.
कोल्हापूर : कोल्हापूूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणावेच लागेल, असा आदेश सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांना दिला. गाफील राहू नका, ताकदीने कामाला लागा, असेही त्यांनी सांगितले.
‘कोल्हापूर उत्तर’च्या जागेवर राजेश क्षीरसागर यांनी दावा सांगितला होता. मात्र, आघाडीच्या सूत्रानुसार ही जागा काँग्रेसला देण्यात आली. त्यामुळे क्षीरसागर काहीसे नाराज होते. जयश्री जाधव यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते नॉट रिचेबल होते. त्यानंतर रविवारी दुपारी झालेल्या आघाडीच्या मेळाव्याकडेही त्यांनी पाठ फिरविली होती. त्यामुळे आघाडीच्या पातळीवर काहीशी संभ्रमावस्था पसरली होती. या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटीसाठी बोलवले.
सोमवारी दुपारी मुख्यमंत्री दालनात झालेल्या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राजेश क्षीरसागर व संजय पवार यांच्यात बैठक झाली. यामध्ये निवडणुकीची रणनीती ठरविण्यात आली.
त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी खासदार राऊत, अरुण दुधवडकर, संजय पवार, राजेश क्षीरसागर यांच्यासोबत चर्चा केली. जयश्री जाधव या काँग्रेसच्या नव्हे तर शिवसेनेचा उमेदवार म्हणून ताकदीने कामाला लागा. गाफील राहू नका, कोणत्याही प्रकारची हयगय चालणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जयश्री जाधव यांना निवडून आणावेच लागेल, असा आदेश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला. सुमारे अर्धा तास बैठक झाली.
जाधव यांना आमदार करूनच ‘मातोश्री’वर येऊ
जयश्री जाधव यांना आमदार करण्यासाठी दिवसरात्र एक करू, त्यांना आमदार करूनच ‘मातोश्री’वर घेऊन येऊ, अशी ग्वाही राजेश क्षीरसागर व संजय पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिली.