शिर्डी : दुष्काळाच्या प्रश्नावर विरोधी पक्षाने कधीही राजकारण केले नाही. उलटपक्षी उपाययोजनांबाबत सरकारला नेहमीच विधायक सूचना केल्या. राज्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षांचे सहकार्य हवे असल्यास त्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.दुष्काळी स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांच्या विधानावर विखे म्हणाले, दुष्काळाबाबत संवेदना नसलेले हे ‘सेल्फी’ सरकार आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांतून नागरिकांचे स्थलांतर सुरू होते, तेव्हा या सरकारच्या संवेदना कुठे होत्या, असा सवालही त्यांनी केला़ दुष्काळाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरले आहे़ मुख्यमंत्री आता सहकार्याची भूमिका बोलत असले तरी त्यांचा प्रयत्न कृतीत उतरत नाही. त्यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलावून दुष्काळ उपाययोजनांवर चर्चा करावी. केंद्र सरकारकडून निधी आणण्यासाठी पंतप्रधानांकडे चला, असे आम्ही सातत्याने सरकारला सांगत आहोत. राज्याचा दबावगट निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही. परंतु सरकारकडून प्रतिसादच मिळाला नाही. पाण्याचा प्राधान्यक्रम ठरलेला असतानाही राज्य सरकारमधील मंत्र्यांची याबाबत एकवाक्यता नाही. पिण्याच्या पाण्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट असले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
‘दुष्काळावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक बोलवावी’
By admin | Published: April 19, 2016 4:12 AM