पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारपासून महाजनादेश यात्रा काढत आहे. बांधकाम मजुरांचे मृत्यू, पीक विमा योजनेत खासगी कंपन्यांकडून करण्यात येणारी नफेखोरी, धनगर आरक्षण, कांदा आणि ठिबकचे थकलेले अनुदान अशा अकरा प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांना द्यावी लागतील. अन्यथा आम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ जनतेची आक्रोश यात्रा काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वसंतराव नाईक यांच्या नंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पदाची कारकीर्द पूर्ण केल्याचा उल्लेख करुन स्वत:ची पाठ थोपटून घेतली. आता अगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजनादेश यात्रा काढत आहेत. पुणे शहरामधे बांधकाम मजुरांना आपले प्राण गमवावे लागले. बांधकाम कामगार मंडळाकडे दहा हजार कोटींचा निधी जमा झाला आहे. त्यातील किती पैसे बांधकाम मजुरांवर खर्च करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सहकारमंत्री सुभाष देशमुख, तानाजी सावंत, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांकडे ऊस बिलाची थकबाकी आहे. शेतकºयांनो धीर धरा असे आपण त्यांना सांगणार आहात का? असा प्रश्न शेट्टी यांनी या वेळी उपस्थित केला. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे सर्व लाभ कसे देणार, लिंगायत समाजाला ओबीसीच्या सवलती कशा देणार, मराठवाड्यातून विमा कंपन्यांनी २९०० कोटी रुपये जमा केले. मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना १२२१ कोटी रुपयांचा नफा मिळविला. हा नफा कसा कमावले हे आपण शेतकºयांना कसे सांगणार आहात. खरेतर सरकारने पीक विमा योजना नव्हे तर, प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना सुरु केली असल्याची टीका शेट्टी यांनी केली. तसेच, मुख्यमंत्र्यांना या प्रश्नांची उत्तरे न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश या यात्रा मार्गावरुन स्वाभिमानी संघटना जनतेची आक्रोश यात्रा काढेल, असे शेट्टी यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी '' या '' ११ प्रश्नांची उत्तरे द्यावीत : राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 6:19 PM
... अन्यथा आम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ जनतेची आक्रोश यात्रा काढू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
ठळक मुद्दे स्वाभिमानी काढणार आक्रोश यात्रा