मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शनिवारी पुणे महानगरपालिकेत हल्ला करण्यात आला. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी आता थेट मुख्यमंत्री कार्यालयावर गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या सूचनेनंतर माझ्यावर हल्ला झाला. माझे हात पाय मोडण्याच्या उद्देशानं हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसैनिक अशा पद्धतीनं कटकारस्थान रचून हल्ला करतात, त्याचं वाईट वाटतं, असं सोमय्या म्हणाले. या प्रकरणी उद्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शनिवारी पालिका कार्यालयाला सुट्टी होती. मग शिवसैनिक आत घुसलेच कसे? त्यांना आत कोणी सोडलं?, असे प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केले.
भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे मुख्यमंत्री ठाकरे अस्वस्थ आहेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत, अनिल परब अडचणीत आहेत. हे दोन नेते मुख्यमंत्र्यांचा उजवा आणि डावा हात. दोघेही अडचणीत आल्यानं मुख्यमंत्री चिंतेत आहेत. त्यामुळेच हल्ल्याचा कट रचला गेला आणि मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना झाल्यानंतरच हल्ला केला गेला, असा आरोप सोमय्यांनी केला.
किरीट सोमय्यांचे हात पाय मोडा. दोन-तीन महिने जागेवर उठता कामा नये अशा प्रकारच्या सूचना शिवसैनिकांना सीएमओतून मिळाल्या आहेत. त्यामुळेच पालिका कार्यालयाला सुट्टी असतानाही जवळपास १०० शिवसैनिक पुणे महापालिकेत शिरले. त्यांच्याकडे मोठमोठे दगडे आणि काठ्या होत्या. स्थानिक पोलिसांनी त्यांना रोखायला हवं होतं. मात्र तसं झालं नाही. कारण हा हल्ला पूर्वनियोजित होता. मुख्यमंत्री घाबरले असल्यानंच त्यांनी हत्येसाठी गुंड पाठवले, असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला.