कऱ्हाड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी कऱ्हाड दौऱ्यात आले असताना डॉ़ नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी शैला व मुलगा डॉ़ हमीद यांनी त्यांची विमानतळावर भेट घेतली़ सुमारे पंधरा मिनिटे त्यांच्यात कमराबंद चर्चा झाली़ यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा़ एऩ डी़ पाटील यांची उपस्थिती होती़ दाभोलकर हत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आठवड्यात बोलून सीबीआयला सूचना देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले़ याबाबत प्रा़ पाटील व डॉ़ हमीद दाभोलकर यांनी सांगितले की, ‘डॉ़ दाभोलकर यांच्या हत्येला सव्वावर्ष पूर्ण झाले़ मात्र, अद्यापही तपास यंत्रणेला यश आलेले नाही़ सीबीआय, दहशतवादविरोधी पथकाकडेही तपास देण्यात आला; पण त्यांनाही यामध्ये काहीही प्रगती करता आलेली नाही़ मागचे सरकार हे दाभोलकर हत्येच्या तपासाविषयी फार गंभीर नव्हतेच; मात्र नव्या शासनाकडून आम्हाला अपेक्षा आहेत़’ मुख्यमंत्र्यांशी भेटल्यानंतर त्यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र यांच्याशी या विषयावर बोलतो,’ असे सांगितले़ ‘पंतप्रधान आता तपास यंत्रणेला सूचना देतील,’ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे़ (प्रतिनिधी)प्लँचेटमुळे पोलीस प्रशासनाची बदनामी‘अंनिस’ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ़ दाभोलकर यांच्या खुनाचा तपास अशास्त्रीय व बेकायदेशीर प्लँचेटमार्फत केल्यामुळे दिशाभूल झाली आहे़ तसेच पोलीस प्रशासनाची बदनामी झाली आहे़ पोलीस महासंचालकांनी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल उपलब्ध करून द्यावा़ जादूटोणाविरोधी कायदा शासनाने पारित केला़ आतापर्यंत शंभर गुन्हे दाखल झाले आहेत़ यासाठी नव्याने शासकीय समिती गठित करून आर्थिक व प्रशासकीय व्यवस्था केली जावी़
दाभोलकरप्रकरणी पंतप्रधानांशी बोलण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
By admin | Published: November 26, 2014 10:35 PM