डोंबिवली : केडीएमसीच्या २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी साडेसहा हजार कोटींचा निधी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या आश्वासनाला तीन वर्षे पूर्ण होऊनही कोणतीच अंमलबजावणी न झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी गाजराचा केक कापून निषेध केला.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह मनोज घरत, मंदा पाटील, प्रल्हाद म्हात्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साजरा केलेल्या ‘फेकू आश्वासन दिना’मध्ये फडणवीस यांच्या वतीने दिलेल्या खोट्या आश्वासनांचा निषेध करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत विकासाची गंगा आणू, असा प्रचार केला होता. या प्रचारादरम्यान त्यांनी साडेसहा हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले होते. यातील एक दमडीही आजतागायत महापालिकेत आलेली नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवलीचा उल्लेख ‘घाणेरडे शहर’ असा केला आहे. याची सत्ताधारी म्हणून त्यांना लाज नाही, पण शहरवासी म्हणून आम्हाला लाज आहे. आज या पॅकेजच्या आश्वासनाला तीन वर्षे झाली, त्यामुळे गाजराच्या आकाराचा केक कापून आम्ही वाढदिवस साजरा करत असल्याचे कदम म्हणाले. एक पै निधी आला नाही आणि येणारही नव्हता. त्याच निवडणुकीदरम्यान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत मुख्यमंत्री मतांसाठी दिशाभूल करत आहेत, भूलथापा मारत आहेत, त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका, असे मतदारांना निक्षून सांगितले होते. शेवटी, ठाकरे यांचा शब्द खरा ठरला, असे मत मनसेचे शहर संघटक आणि परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे यांनी व्यक्त केले.
सीएमच्या ‘त्या’ आश्वासनाला झाली तीन वर्षे; गाजराचा केक कापून मनसेकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 6:20 AM