संगमनेर (जि. अहमदनगर) : राज्यभरात होणाऱ्या मराठा समाजाच्या शांततापूर्ण आंदोलनांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केला़ बुधवारी येथे आयोजित बैठकीत विखे बोलत होते़ ठिकठिकाणचे मोर्चे ही मराठा समाजातील सर्वसामान्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. मुख्यमंत्र्यांनी या मोर्चात सहभागी संघटनांशी चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु, मराठा समाजासाठी रस्त्यावर उतरलेल्या संघटनांना बाजूला ठेवून केवळ भाजप नेत्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनामध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्न केला आहे, असेही विखे या वेळी म्हणाले. तसेच २३ सप्टेंबर रोजी नगर येथील मोर्चात सहभागी होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.मराठा समाजाच्या आंदोलनांमुळे हादरलेल्या काही मंडळींनी दलित समाजाला चिथावणी देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, असा आरोप करीत भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या यासंदर्भातील विधानाशी सहमत असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठा समाजाच्या आंदोलनाला जातीय रंग देऊन त्याविरोधात दलित समाजाचे प्रतिमोर्चे काढण्याचे कारस्थान रचले जात आहे. मराठा समाजाच्या मोर्चांबाबत गैरसमज निर्माण करून दलित समाजाला फूस देण्याचे उद्योगही काहींनी सुरू केले आहेत, असेही त्यांनी म्हटले. (प्रतिनिधी)
मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा मुख्यमंत्र्यांचा डाव
By admin | Published: September 15, 2016 4:08 AM