ठाणे : अनेक वर्षांपासून प्रादेशिक मनोरुग्णालयात प्रशिक्षकांची वानवा असल्याने मनोरुग्णांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यास मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बनवून घेण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण वस्तूंनाही ब्रेक लागला आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयातील मनोरुग्णांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात कलेची आवड निर्माण व्हावी, कलेच्या माध्यमातून त्यांना व्यक्त होता यावे यासाठी काही वर्षांपुर्वी सुरू केलेल्या डे केअर सेंटरमध्ये विविध उपक्रम राबविले जात होते. जे मनोरुग्ण प्रादेशिक मनोरुग्णालयातून उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहे अशा रुग्णांसाठी एनआरएचएम योजनेअंतर्गत अंतर्गत हे सेंटर चालविले जात. यात हस्तकला, शिलाई, संगणक आदींचे प्रशिक्षक सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांना प्रशिक्षण देत असत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून राख्या, कापडी, कागजी पिशव्या, पणत्या, कापडी तोरणे आदी वस्तू मनोरुग्ण बनवित असत. त्यांच्या वस्तूंना २०१२-१३च्या काळात चांगलाच प्रतिसाद मिळू लागला. त्यांच्या वस्तू थेट मॉलपर्यंतही पोहोचल्या. या वस्तूंच्या विक्रीतून येणारा नफा या रुग्णांना विभागून दिला जात असे. परंतू शासनाकडून येणारे मानधन कालांतराने मिळणे कठिण झाल्यामुळे हे सेंटरच बंद पडले. त्यामुळे अर्थात प्रशिक्षक येणेही बंद झाले. गेल्या अनेक महिन्यांपासून मनोरुग्णांना नाविन्यपूर्ण वस्तू शिकविण्यासाठी प्रशिक्षकच नसल्याने त्यांच्या वस्तूंना बाजारपेठच मिळत नाही. त्यामुळे त्यांचा आधारच गेला आहे. प्रशिक्षक मिळाल्यास ज्या निवासी मनोरुग्णांमध्ये वस्तू बनविण्याची क्षमता आहे त्यांच्या क्षमतेचा, कलेचा वापर करुन विविध वस्तू बनवून घेण्याची रुग्णालयाची तयारी आहे. मात्र, मनोरुग्णालय सध्या प्रशिक्षकांच्याच प्रतिक्षेत आहे. >सेंटरचा प्रस्ताव खितपतदीड वर्षे प्रादेशिक मनोरुग्णालयातील डे केअर सेंटर बंद पडले असून या सेंटरला पुनर्जीवन देण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून हे सेंटर पुन्हा उभे केले जाणार आहे. परंतू त्याबाबतचा प्रस्ताव पाच ते सहा महिन्यांपासून शासनाकडे खितपत पडला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास प्रशिक्षकांच्या माध्यमातून पुन्हा नविन कलेला उभारी मिळण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक मनोरुग्णालयात प्रशिक्षकांची वानवा
By admin | Published: August 02, 2016 3:52 AM