ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. २१ - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीमध्ये पदांसाठी नव्हे तर जागांसाठी लढा सुरु आहे. तर शिवसेना - भाजप युतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी संघर्ष सुरु आहे. हाच दोघांमधील फरक आहे असा टोला काँग्रेस नेते व प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी महायुतीला लगावला आहे. लोकसभा निवडणुकानंतर मोदी लाट निघून गेली असून आता काँग्रेसचाच विजय होईल असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे.
औरंगाबादमध्ये रविवारी काँग्रेस नेते नारायण राणे, अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यात नारायण राणेंनी पुन्हा एकदा महायुतीवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम उमेदवार नसतानाही महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन संघर्ष सुरु आहे. शिवसेना - भाजपचा हा स्वार्थी हेतू प्रचारादरम्यान जनतेसमोर मांडू असे नारायण राणेंनी सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी लाट ओसरली आहे मोदी सरकारने दिलेली आश्वासनं १०० दिवसांत पूर्ण केलेली नाही. मोदी सरकारची ही निष्क्रियता जनतसमोर मांडणार असल्याचे राणेंनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसला १२४ जागा देण्याची तयारी असल्याचे नारायण राणेंनी नमूद केले असून आघाडीचा निर्णय हा दोन्ही पक्ष व राज्यासाठी हितकारकच ठरेल असेही राणेंनी म्हटले आहे.
निलेश राणे भास्कर जाधवांविरोधात निवडणूक लढवणार नाही. मात्र 'परतफेड' करणे हा राणे कुटुंबाचा गूणधर्म आहे असे सूचक विधानही राणेंनी केले.