ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 26 - मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालात शिवसेनेला 84 जागा तर भाजपाला 82 जागा मिळाल्याने कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. महापालिकेतील बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने राजकीय समीकरणे जुळविण्याची कसरत सुरू केली आहे. युती तोडल्यानंतर शिवसेना पुन्हा भाजपाबरोबर जाणार का? की काँग्रेसशी हातमिळवणी करणार यासरख्या चर्चेला उधाण आले आहे. काल संजय निरुपम यांनी शिवसेनेने युतीसाठी विचारणा केल्याचा गौप्यस्फोट केला होता. उद्धव ठाकरे यांनी ट्विट करत याचे उत्तर दिले आहे. काँग्रेसशी युती ?, थोडं थांबा, योग्य वेळेवर सांगतो ! अशा प्रकरचे ट्विट करत त्यांनी भाजपाला सावधेतेचा इशाराच दिला आहे असं म्हणावे लागेल. दुसऱ्या एका ट्विटमध्ये उद्धव यांनी मतदार यादीत झालेल्या घोळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 11 लाख मतदारांची नावे यादीतून गायब झाली नसती तर, आज चित्र वेगळेच असते. आपल्या अनेक जागा अगदी थोड्या मतांच्या फरकाने गेल्या. बाळासाहेबांनी दिलेल्या शपथेच्या आणि निष्ठेच्या शिकवणीवर, निखाऱ्यांवर शिवसैनिक वाटचाल करतो आहे. हे यश शिवसैनिकांच्या ताकदी शिवाय कधीही शक्य नव्हते. भाजपाकडे केंद्रात आणि राज्यातल्या सत्तेची ताकद होती. शिवसैनिक वडापाव, भाकरी खाऊन रस्त्यावर लढला. मुंबईत शिवसेनाच आहे आणि राहणार असेही ते म्हणाले. केवळ मुंबईचा महापौरच नव्हे तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असेही त्यांनी ट्विट केले आहे.
काँग्रेसशी युती ?, थोडं थांबा - उद्धव ठाकरे
By admin | Published: February 26, 2017 1:58 PM