मुंबई : सपा-बसपाने उत्तरप्रदेशमध्ये वेगळी चूल मांडल्याने लोकसभेची गणिते जुळविताना काँग्रेसला घाम फुटला आहे. यामुळे सपा आणि बसपाला महाराष्ट्रात वाट्याला आलेल्या जाग सोडण्याच्या विचारात काँग्रेसचे नेते आहेत. शुक्रवारी समाजवादी पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्यासह सहा उमेदवार घोषित केल्याने महाआघाडीसाठी वाट पाहत असलेल्या काँग्रेसला झुकावे लागले आहे. यामुळे बसपाला महाराष्ट्रात 2 तर सपाला 1 लोकसभेची जागा सोडण्याचा विचार काँग्रेस करत असून या खुष्कीच्या मार्गाद्वारे उत्तरप्रदेशमध्ये आघाडी होण्याची आशा आहे.
महाराष्ट्रातील दलित आणि मुस्लिम व्होटबँक लक्षात घेऊन काँग्रेस ही खेळी खेळणार आहे. याआधी प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमच्या ओवेसींसाठी हा फॉर्म्युला वापरण्यात आला होता. मात्र, आंबेडकरांनी 22 जागा मागितल्याने हा प्रस्ताव बारगळला होता. आता काँग्रेस उत्तर प्रदेशातील 80 जागा लक्षात घेऊन पाऊले उचलत आहे. महाराष्ट्रात एकूण मतदानाच्या 11.5 टक्के मुस्लिम आणि 7 टक्के दलित मते आहेत.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या म्हणण्यानुसार भारिपा बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरु होती. मात्र, यामध्ये कोणतीही प्रगती झालेली नाही. भाजपाला हरविण्यासाठी सपा आणि बसपा आमच्या सोबत येईल अशी अपेक्षा आहे. भाजपविरोधी मतांमध्ये फूट टाळण्यासाठी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे. सपा, बसपाला कोणत्या जागा सोडायच्या याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते ठरवतील.एका माहितीनुसार मुंबई उत्तर आणि महाराष्ट्रातील इतर भागातील जागा या दोन पक्षांना सोडण्यात येतील.
दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपा आघाडीमध्ये काँग्रेसने सहभागी व्हावे याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पक्षाचे प्रवक्ते उदयवीर सिंह यांनी गुरुवारी ट्वीट करून सांगितले की, आघाडीत कोणताही बदल होणार नाही. यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये होत असलेली चर्चा ही अफवा आहे. बसपाचे नेतेही काँग्रेसच्या सहभागाबाबत नकार देत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेशीही चर्चाकाँग्रेस-राष्ट्रवादीची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरु आहे. मात्र, शेट्टी तीन जागा मागत असून राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या मतानुसार त्यांना दोन जागा देण्यास तयारी आहे.