नवी दिल्ली : मुंबईतील सागरी रस्ते मार्गाचा अंतिम अध्यादेश येत्या १५ दिवसांत प्रकाशित करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री जावडेकर यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय नगर विकास मंत्री वेंकय्या नायडू, रेल्वेमंत्री प्रभू, पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासंदर्भात चर्चा केली. त्यावेळी जावडेकर यांनी ही माहिती दिली. मुंबई सागरीमार्गाच्या प्रकल्पांबाबत नागरिकांकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. या सूचनांचा विचार करून योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. नागरिकांना वाहतुकीसाठी हा मार्ग सुलभ ठरण्यासाठी विविध प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यावरही यावेळी चर्चा झाली. पर्यावरणाचे संरक्षण व विकास या दोन्ही बाबी विचारात घेऊनच सर्व प्रकल्पांना मंजुरी देण्यात येईल, असे जावडेकर यांनी स्पष्ट केले. पश्चिम घाटाचे क्षेत्र निश्चित करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. वन्यजीव अभयारण्य वा विशेष वनक्षेत्रे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये रूपांतरित करण्याची एक योजना पर्यावरण मंत्रालयास सोपवली गेली, अशी माहितीही त्यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)रेल्वे प्रकल्पांसाठी स्वतंत्र कंपनीमहाराष्ट्रातील सर्व रेल्वे प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्याचा निर्णय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून, सुमारे २० वर्षांपासून रखडलेली बीड-नगर-परळी वैजनाथ रेल्वे प्रकल्पाच्या वाढीव खर्चास (२,२७२ कोटी) आणि वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे योजनेच्या अंदाजे ४७० कोटी रुपयांच्या वाढीव खर्चास रेल्वेमंत्र्यांनी मंजुरी दिली, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे दिली.नक्षलग्रस्त भागातील रेल्वे प्रकल्प तत्काळ सुरू होण्यासाठी राज्य शासनाने जमीन अधिग्रहणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे प्रकल्पाचे काम येत्या मार्चपर्यंत सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन रेल्वेमंत्री प्रभू यांनी दिले. केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी एक अधिकारी महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी नियुक्त करण्यात यावा व प्रत्येक आठवड्यास या अधिकाऱ्यांची बैठक व्हावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. पुणे मेट्रोचे प्रत्यक्ष काम मार्चपासून मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकाळी केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांची भेट घेत प्रलंबित पुणे मेट्रो योजनेवर चर्चा केली. आता पुणे महापालिका मेट्रोसाठीचा नवा विस्तृत प्रकल्प अहवाल(डीपीआर) येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करेल. मार्च २०१६ पर्यंत पुणे मेट्रोचे प्रत्यक्ष कार्य सुरू होण्याची शक्यता आहे.जेटलींनाही भेटले...मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री अरुण जेटली यांचीही भेट घेतली. या भेटीत मुंबई आर्थिक हब बनविण्यावर चर्चा झाली. यासाठी विशेष कृती दलाचे गठण होईल. नवी मुंबई विमानतळासंदर्भात येत्या मार्चपर्यंत एक वित्तीय प्रस्ताव केंद्रास सादर केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. नागपूरला स्मार्ट सिटी बनविण्यास फ्रान्स सरकारने स्वारस्य दाखविले असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोस्टल रोड मार्गी लागणार!
By admin | Published: November 05, 2015 3:44 AM