मुंबई: समुद्राकाठी रहाणार्या व प्रामुख्याने मासेमारी करणार्या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे.सोन्याचा नारल वाहिन मी तुला !! हे देवा तारु येऊ दे बंदराला!! कोळी बांधवांनी अथांग सागरला अशी साद देत आज मुंबईतील वेसावे,मढ, भाटी, मनोरी, मालवणी, गोराई, जुहू, खारदांडा, माहीम, वरळी, धारवी, माहुल, कुलाबा येथील विविध कोळीवाड्यात आज नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी केली. आज नारळी पोर्णिमेनिमित्त सायंकाळी कोळीवाड्यांमध्ये कोविडचे भान राखत मिरवणूका निघाल्या. मावळत्या सूर्याला साक्ष ठेवत वेसावे कोळीवाडयातील विविध गल्लीच्या अध्यक्षांनी सोन्याचा मुलामा दिलेला नारळ सागराला अर्पण केला. तर समुद्रात भरपूर म्हावंर लागू दे. आमच्या बोटी सुखरूप किनारी येऊ दे, अशी मनोभावे सागराचे पूजन करून कोळी महिलांनी प्रार्थना केली अशी माहिती वेसावे कोळीवाड्यातील मोहित रामले यांनी दिली.
वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर येथील नारळी पोर्णिमेच्या उत्सवात सहभागी झाल्या. कोळी बांधबांचे न्याय व हक्क आणि त्यांची मासळी मार्केट शाबूत राहिले पाहिजे. कोळी बांधबांवरील अन्याय कदापी सहन करणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले. मढ कोळीवाड्यात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. सायंकाळी नारळी पोर्णिमेच्या मिरवणुका वाजत गाजत निघाल्या. येथील समुद्रकिनारी कोळी बांधवानी आणि महिलांनी गर्दी केली होती.महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी ही माहिती दिली.
मत्स्य दुष्काळ व कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षे मच्छीमारी मोठी संकटातून बाहेर पडत असतांना असतानाच दादर व शिवाजी मंडई मधून मासे विक्रेता महिलांना विस्थापित करण्याचे दुःखाचे सावट असल्याने आजच्या नारळी पौर्णिमा उत्सव कोळी समाजाच्या भावनांचा उद्रेक असल्याची भावना मुंबईतील विविध कोळीवाड्यांमध्ये दिसून आले..
वेसावा कोळीवाडा मासेमारीसाठी सर्वात मोठा असला आणि कोळी समाजाच्या निरनिराळ्या उत्सवांचे जोरदार स्वागत या कोळीवाड्यात होत असले तरी नारळी पौर्णिमा उत्सवाचा नारळ समुद्रात अर्पण करताना आपण मुंबईचे मूळ भूमीपुत्र असूनही या राजकीय व्यवस्थेने आम्हास अस्तित्वहीन करण्याचे षडयंत्र आखले असल्याची खंत वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय व कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी दिली.