ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 26 - राज्यातील २६ जिल्हा परिषदा व 10 महानगरपालिकांसाठी सात जानेवारीपासून आचारसंहिता लागण्याची शक्यता असून १५ ते २१ फेब्रुवारीच्या दरम्यान चार टप्प्यांत मतदान होईल, अशी शक्यता राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. खुद्द महसूलमंत्र्यांनी ही शक्यता व्यक्त केल्याने जानेवारीच्या पहिल्या किंवा अगदीच दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होणार हे निश्चित मानले जात आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही शक्यता व्यक्त केली. पाटील म्हणाले, या तारखा जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग स्वायत्त आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम ते घोषित करतील. मात्र, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या सभागृहांच्या संपणाऱ्या मुदतींचा विचार करता सात जानेवारीपासून आचारसंहिता लागू होईल, असे वाटते. त्यानंतर चार टप्प्यांत मतदान होईल. राज्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने जिल्हा परिषदांचे आणि महानगरपालिकांचे मतदान चार टप्प्यांत घेण्याचे नियोजन आहे. ज्या जिल्ह्यात महानगरपालिकेची निवडणूक आहे तेथे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांचे मतदान एकाच दिवशी घेण्यात येईल. बहुतांशी सभागृहांच्या मुदती या मार्चमध्ये संपत असल्याने त्याआधी निवडणुका होऊन नवे सभागृह अस्तित्वात येणे आवश्यक आहे.