महाबळेश्वर : वारकरी संप्रदायातील अनिष्ठ रुढी परंपरा संपविण्यासाठी आवश्यक ती आचारसंहिता ठरविण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. हा निर्णय महाबळेश्वर येथे शुक्रवारी पार पडलेल्या राजस्तरीय चिंतन बैठकीत घेण्यात आला. वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाबळेश्वरला बैठक झाली. यावेळी वैश्विक बंधुतेचा व मानवतेचा विचार मांडणाऱ्या संप्रदायाचा सामुदायिक चेहरा जगासमोर आणण्यासाठी दिशा ठरविण्यात आली. संप्रदायाला भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांबरोबरच श्रीक्षेत्र पंढरपूरसह तीर्थक्षेत्रे व पालखीमार्ग व विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष बद्रनाथ महाराज तनपुरे, पंढरपूर, देहूफड प्रमुख बापूसाहेब महाराज देहूकर, डॉ. शिवाजीराव मोहिते, आळंदी, ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे अध्यक्ष भानुदास महाराज ढवळीकर, माधव महाराज शिवणीकर, निवृत्ती महाराज नामदास, पंढरपूर, बाळासाहेब आरफळकर, श्यामसुंदर महाराज सोन्नर, मुंबई, मुरलीधर पाटील, त्र्यंबकेश्वर, दामोदर महाराज गावले, नाशिक, डॉ. कैलास इंगळे, औरंगाबाद, मारुती महाराज कोकाटे, पुणे, एकनाथ महाराज हंडे, संजय महाराज देहूकर, जगन्नाथ महाराज देशमुख, भागवत महाराज चवरे, भागवत महाराज कबीर, श्यामसुंदर महाराज उखळीकर, पंडित महाराज ठाकूर, पंढरपूर, मदन महाराज कदम, सातारा, महादेवबुवा शहाबाजकर, मुंबई, रवींद्र महाराज हरणे, जळगाव, गजानन महाराज गायकवाड बुलढाणा, नामदेव चव्हाण, पंडित महाराज क्षीरसागर यांच्यासह राज्यभरातील वारकरी, पदाधिकारी उपस्थित होते.कीर्तनकारांनी समाजसुधारणेचे भान ठेवले पाहिजे. कीर्तनकारांनी सामाजिक प्रश्नांवर आसूड ओढले पाहिजेत. हस्याचार्य, विनोदाचार्य, विनोदसम्राट या उपाधी कीर्तनकारांना शोभत नाहीत. त्यामुळे संप्रदायाची चेष्ठा होते. जगाच्या संघर्षात संप्रदाय कोठे आहे, तो कोठे नेला पाहिजे. याचा विचार करून आपापसात कोणताही भेद न ठेवता विश्वबंधुत्वाचा व मानवतेचा विचार पुढे नेला पाहिजे, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे सातत्य ठेवणे, जगभर संप्रदायाचा प्रसार करणे, पुणे व मुंबईत अभ्यास केंद्र सुरू करणे, पंढरपूर, आळंदी, पैठण व त्र्यंबकेश्वर येथे स्वच्छतागृहासाठी शंभर टक्के अनुदान मिळविणे, चंद्रभागा तिरी घाट बांधणे व थिम पार्कची उभारणे करणे, वारकरी शाळांना अनुदान मंजूर करणे हा वारकरी साहित्य परिषदेने आखलेल्या सोळा कलमी कार्यक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. याची अंमलबजावणी करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.महाबळेश्वर येथे राज्याच्या विविध भागातील किर्तनकार, प्रवचनकार तसेच या क्षेत्रात कार्यरत असलेल्या विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आचारसंहिता समिती स्थापन करणार
By admin | Published: October 20, 2014 9:54 PM