नागपूर : पोलीस विभागातील अधिकाऱ्यांकडून पोलीस शिपायांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ही बाब विचारात घेता विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या तक्रारी व अडचणी सोडविण्याच्या हेतूने पोलीस संहिता तयार केली जाणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी मंगळवारी विधान परिषदेत लक्षवेधीवरील निवेदनात दिली.पोलीस विभागासंदर्भात शासनाला प्राप्त झालेल्या निनावी तक्रारींची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. पोलीस महासंचालकांना याबाबत आवश्यक कारवाई करण्याचे कळविले होते. त्यानुसार विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी या प्रकरणाची शहानिशा करून राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना सदर पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्राप्त निनावी निवेदनाच्या अनुषंगाने त्यांच्या शंका निरसनासाठी दरबार घेऊ न पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नाशिक शहर आस्थापनेवरील अधिकाऱ्यांकडून अधिकाराचा गैरवापर करण्यात आल्याबाबत तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात नाशिक येथील पोलीस आयुक्तांना सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या अडीअडचणी आणि तक्रारी सोडविण्यासाठी घटक पातळीवर परिषदेचे आयोजन केले जाते. तसेच वेळोवेळी आज्ञांकित कक्ष तसेच दरबाराचे आयोजन होत असल्याची माहिती पाटील यांनी दिली. मुंबई व नाशिक शहर पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक मिळत असल्याबाबतचा मुद्दा सदस्य नीलम गोऱ्हे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता. (प्रतिनिधी)
पोलीस विभागासाठी संहिता
By admin | Published: December 23, 2015 1:24 AM