लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आईवर तब्बल ९ वार करून केलेली निर्घृण हत्या हा ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’ असल्याचा दावा वाकोला पोलिसांनी केला आहे. सिद्धांतने अतिशय थंड डोक्याने विचार करून ही हत्या केली. तसेच यामागे शिक्षण हे प्रथमदर्शनी कारण दिसले तरी यामागचा मुख्य उद्देश वेगळाच असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याच्या पोलिसांच्या मागणीवर न्यायालयाने सिद्धांतला २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सांताक्रूझ येथे राहत्या घरात दीपाली गणोरे यांची निर्घृण हत्या करत पसार झालेल्या सिद्धांतला जोधपूरमधून शुक्रवारी पहाटे मुंबईत आणले. या गुन्ह्यात त्याला अटक करून शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास सिद्धांतला वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी सिद्धांतने निळ्या रंगाचा चौकटीचा शर्ट आणि काळ्या रंगाची पॅण्ट घातली होती. त्याला न्यायालयात उभे केल्यापासून तो निर्विकार चेहऱ्याने स्तब्ध उभा होता. महानगर दंडाधिकारी जी.आर. तौर यांच्यासमोर सरकारी वकील मिलिंद नेरलीकर यांनी सिद्धांतच्या वाढीव कोठडीची मागणी केली. यात सुरुवातीलाच हा कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याचा दावा पोलिसांनी केला. हा गुन्हा अकस्मात घडलेला नसून अतिशय शांत डोक्याने पूर्वनियोजित केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सिद्धांतच्या चौकशीत त्याला अभ्यासावरून आई ओरडत होती, तिच्याकडून त्याला जाच होता तसेच घरात सतत होत असलेल्या आईवडिलांच्या भांडणाला तो कंटाळला होता. यामुळे हे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले आहे. मात्र या वेळी शिक्षण हे एकच कारण यामागे नाही. यामागे आणखी काही कारणे आहेत का? ज्याचा सिद्धांतच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. त्याचा शोध घेणे गरजेचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.तसेच हत्या दरम्यानचे सिद्धांतचे कपडे अद्याप सापडलेले नाहीत. जमिनीवर रक्ताने लिहिलेला मजकूर त्यानेच लिहिला का? त्याचे फिंगर प्रिंट घेणे बाकी आहे. तसेच या कटात आणखी कुणाचा सहभाग आहे? या बाबींच्या पडताळणीसाठी सरकारी वकिलांकडून सिद्धांतच्या वाढीव कोठडीची मागणी करण्यात आली. पाच ते दहा मिनिटे सुरू असलेल्या सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर या वेळी न्यायालयाने हा गंभीर गुन्हा असून याचा योग्यरीतीने तपास होणे आवश्यक असल्याचे सांगून सिद्धांतला २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
...हा तर ‘कोल्ड ब्लडेड मर्डर’
By admin | Published: May 27, 2017 3:08 AM